काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या बसस्थानकाकडे जाणाऱ्या पुलापासून ते बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्ता, पुल व अतिक्रमणाचा प्रश्न ग्रामपंचायत मधील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे व वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे यांच्या सहकार्याने मार्गी लागला असून या रस्त्यावर झालेल्या डांबरीकरणाचे लोकार्पण 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.
गावचे प्रवेशद्वार समजला जाणारा व गावाला जोडणारा हा रस्ता व्हावा ही गेल्या अनेक वर्षांपासूनची गावातील ग्रामस्थांची इच्छा होती. परंतु ग्रामपंचायतही ग्रामपंचायत स्तरावर या रस्त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने हे डांबरीकरणाचे व पुलाचे काम करु शकत नव्हती.काटी ते सुरतगाव रस्त्याचे डांबरीकरणाचे काम केलेल्या पुण्यातील वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीशी येथील ग्रामपंचायतच्या शिष्टमंडळाने संपर्क व कागदी पत्र व्यवहार करुन हे काम करुन देण्यासाठी विनंती केली होती.
ग्रामपंचायतने केलेल्या विनंतीचा व ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणींचा विचार करुन पुण्यातील वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पुल ते बस स्थानकापर्यंतचा 12 मीटर रुंदीचा व 250 मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम व पुलाचे काम पुर्ण केले असून बस स्थानकावरील अतिक्रमणामुळे वाहन चालकांसह नागरिकांचा कोंडमारा होत होता. उपसरपंच जुबेर शेख, सुजित हंगरगेकर व कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांनी बस स्थानकावरील व्यवसायिकांना विनंती करुन बरेचसे अतिक्रमण हटविले.त्यामुळे बस स्थानक परिसर डांबरीकरण झाल्याने व येथील अतिक्रमणे हटविण्यात आल्याने काटीतील बस स्थानक परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे काम झाल्याने एसटी, वाहन धारक, प्रवासी व नागरिकांना या रस्त्याचा फायदा होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बुधवार दि. 15 ऑगस्ट रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतच्या वतीने या रस्त्यावरील डांबरीकरणाचे व पुलाचे काम करुन दिल्याबद्दल वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे साईट इंजिनिअर वैभव गुंड यांचा सरपंच आशाताई सुजित हंगरगेकर नवनिर्वाचित उपसरपंच शुभांगी चंद्रकांत काटे,कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी उपसरपंच जुबेर शेख, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत सुरवसे, प्रदीप साळुंके, चंद्रकांत काटे, प्रकाश गाटे, अभिमन्यू बामणकर, धनाजी गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करुन आभार व्यक्त केले.
वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनी व व्यवसायिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार
"गावचे प्रवेशद्वार असलेल्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. व या कामासाठी ग्रामपंचायत स्तरावर पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता. हे काम कुठल्याही नकाशावर नव्हते किंवा या रस्त्याला कुठलाही नंबर नसल्यामुळे अडचणी येत होत्या.
वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनी पुणे यांच्याकडे हा रस्ता करुन देण्यासाठी कागदी पत्र व्यवहार व वारंवार पाठपुरावा करुन विनंती केली होती. या ग्रामपंचायतने केलेली विनंती व नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीने या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याने कंपनीचे आभार व बस स्थानकावरील व्यवसायिकांनी ग्रामपंचायतने केलेल्या विनंतीला मान देऊन अतिक्रमणे हटविण्या संदर्भात सहकार्य केल्याचे समाधान आहे."
--सुजित हंगरगेकर
जिल्हाध्यक्ष सरपंच परिषद, धाराशिव
या कामामुळे विकास कामात भर पडली
---सयाजीराव देशमुख
जिल्हा उपाध्यक्ष कॉंग्रेस कमिटी, धाराशिव
"ग्रामपंचायत स्तरावर या कामासाठी निधी येत नसल्याने ग्रामपंचायत स्तरावरील विविध निधी या कामासाठी खर्ची करावे लागले असते. त्यामुळे ग्रामपंचायत शिष्टमंडळाने या कामासाठी वारंवार वॉटर फ्रंट कंपनीकडे पाठपुरावा केला. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेत या कंपनीने हे काम पुर्णत्वास नेले. गावच्या प्रवेशद्वारातील या कामामुळे गावच्या विकासामध्ये भर पडली आहे."
ग्रामपंचायतच्या पाठपुराव्याला यश
"वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीकडे ग्रामपंचायतच्या शिष्टमंडळाने केलेल्या कामाला अखेर यश मिळाले असून या कामासाठी कंपनीने ग्रामस्थांच्या समस्या लक्षात घेऊन केलेल्या कामामुळे गावच्या सौंदर्यात भर पडली आहे."
-- जुबेर शेख
माजी उपसरपंच
ग्रामपंचायत कार्यालय काटी ता. तुळजापूर
गावाचा पारंपरिक वहिवाटीच्या रस्त्याचा प्रश्न मिटला
गावातील पारंपरिक वहिवाटीचा व मुख्य प्रवेशद्वार असलेला रस्ता अनेक वर्षांपासून अडचणींचा झालेला होता. या रस्त्याची व्यथाही आजपर्यंत कोणाला कळाली नव्हती. परंतु वॉटर फ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीने नागरिकांची व्यथा लक्षात घेऊन या रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे काम करुन दिल्याबद्दल ॠणी आहोत.
प्रदीप साळुंके
प्रगतशील शेतकरी, काटी
0 Comments