तुळजापूर:-कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयास मंजुरी मिळाली आहे. गुरुवार, 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तुळजापूर येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व्हावे, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा करीत होतो. त्याला यश मिळाले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
तुळजापूर आणि परिसरातील अनेक नागरिक आणि विधीज्ञांंची या महत्वपूर्ण निर्णयामुळे मोठी सोय होणार आहे. त्याचबरोबर वेळ आणि पैशाची बचतही होणार आहे. पूर्वी पाच लाख मुल्यांकनापेक्षा अधिक मुल्यांचे दावे, कौटुंबिक वाद, भूसंपादनाचा वाढीव मोबदला, शासन विरोधातील विशेष दावे आदींसाठी धाराशिव येथील वरिष्ठ न्यायालयात यावे लागत होते. त्यासाठी वेळ आणि पैसाही जात होता. तसेच धाराशिव येथील न्यायालयात विविध दाव्यांचे प्रमाण अधिक असल्याने निकालासाठीही प्रतिक्षा करावी लागत होती. आता तुळजापूरला वरिष्ठ दिवाणी स्तर न्यायालय मंजूर झाल्याने न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा कमी वेळेत होणार आहे.
राज्य सरकारने तुळजापूरकरांसाठी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. हे न्यायालय सुरू झाल्यानंतर विधीज्ञ आणि पक्षकारांनाही त्याचा लाभ होणार आहे. तुळजापूर तालुका विधीज्ञ मंडळ यासाठी आग्रही होते. त्यांच्या मागणीची राज्य सरकारने सन्मानपूर्वक दखल घेवून निर्णय घेतला आहे. त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तुळजापूर तालुक्याच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करून लवकरच नवीन न्यायालयीन इमारतीचे काम पूर्ण होईल, त्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच या नवीन इमारतीमध्ये नवीन न्यायालयात न्यायदानाचे काम सुरू होईल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
0 Comments