काटी/उमाजी गायकवाड
मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून होणारा छळ, नकोशी म्हणून केला जाणारा तिरस्कार, मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या अशा अनेक घटना आपण नेहमी पाहतो. पण सध्या मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या अनेक सुखद घटनाही समोर येत आहेत.
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील पोलीस पाटील लक्ष्मण माळी-पाटील कुटुंबियातील सचिन माळी यांनी आपल्या कन्यारत्नाचे आकर्षक सजावट केलेल्या वाहनाने आगमन, वाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, घरामध्ये व परिसरात आकर्षक रांगोळीची सजावट करत धुमधडाक्यात अनोखे स्वागत केले.
मुलगी झाली म्हणून तीचे अशा पध्दतीने केलेल्या स्वागताचे मंगरुळसह परिसरातून कौतुक होत आहे.
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील माळी पाटील परिवाराने पाच पिढ्यानंतर जन्मलेल्या पहिल्या,दुसऱ्या व तिसऱ्या मुलीचेही अफलातून स्वागत केले. मुलगी हीच घराच्या वंशाचा दिवा असल्याचे दाखवून देत स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्याना जबरदस्त चपराक दिली आहे
मंगरुळ येथील पोलीस लक्ष्मण माळी पाटील यांचे धाकटे बंधू सचिन माळी यांना मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून त्यांनी तिचे अनोखे स्वागत केले. गावातील प्रमुख मार्गावरून घरापर्यंत आकर्षक रांगोळीची सजावट करीत गाडीमधून कन्या व तिच्या आईचे आगमन झाल्यानंतर वाद्यांच्या गजरात माळी यांच्या निवासस्थानपर्यंत मिरवणुकीद्वारे त्यांनी मुलीचे स्वागत केले. घराजवळ कन्यारत्न येताच फटाक्यांची आतषबाजी व मिठाईचे वाटप करण्यात आले.
रांगोळ्यांच्या व फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. दरवाजात औक्षण करण्यात आले. धान्याचे माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरात घेण्यात आले. एका कन्येचा हा राजेशाही स्वागत समारंभ पाहून मंगरुळवासियांचे डोळे दिपून गेले.
0 Comments