Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

नागपूर ते गोवा महामार्गाला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला खुंटेवाडीत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; शेतकऱ्यांवर सर्वे साठी पोलीस बळाचा वापर

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी शिवारात वर्ध्याहून निघणाऱ्या नागपूर ते गोवा महामार्गाला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वे साठी पोलीस फौजफाटासह बुधवार  दि. 25 रोजी सकाळी आलेल्या अधिकाऱ्यास या भागातील शेतकऱ्यांनी सर्वे साठी तीव्र विरोध केला असून सर्वे साठी शेतकऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वर्ध्याहून निघणाऱ्या व नागपूर ते गोवा महामार्गाला जोडणाऱ्या  राज्यातील  12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी देखील या शक्तिपीठ महामार्गाला विरोध सुरू केला आहे. 

पत्रादेवी-बांदा ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग ते दिगरज (जि.वर्धा) असा एकूण 805 किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग असून वर्धा,यवतमाळ,हिंगोली,नांदेड,परभणी, बीड, लातूर,धाराशिव,सोलापूर,सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतील 12 हजार 589  इतक्या गट नंबरमधील  27 हजार 500 एकरांतून हा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी 86,000 कोटींचा खर्च येणार आहे.

राज्य सरकारने तीन शक्तिपीठांपैकी 
कोल्हापूरची अंबाबाई देवी,तुळजापूरची तुळजाभवानी,नांदेड मधील माहूरची रेणुकादेवी या शक्तीपीठांना जोडणाऱ्या व या महामार्गातील तीर्थक्षेत्रे औंढा नागनाथ, परळी वैजनाथ,पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,नांदेडचे गुरू गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वार,सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर,सांगलीतील औदुंबर, कोल्हापूर मधील नृसिंहवाडी, पट्टणकोडोली,सांगवडे,कणेरी,आदमापूर
या तीर्थ क्षेत्रांना जोडण्यासाठी या नव्या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांच्या मागणी शिवाय व अल्प मावेजासह मंजुरी दिली आहे. 

या गोंधळात ताण आल्याने  शेतकरी बेशुद्धावस्थेत पडला....

बुधवार दि. 25 रोजी तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी शिवारात मोठ्या पोलीस फौजफाट्यासह सर्वे साठी आलेल्या अधिकाऱ्यांना  शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वे साठी तीव्र विरोध केला असून त्यांच्यावर पोलीस बळाचा वापर करुन पोलीस व्हॅन मध्ये घालण्याचा प्रयत्न केल्याने व एक शेतकरी यास विरोध करीत असताना ताण आल्याने  बेशुद्धावस्थेत पडल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


बहुतांश शेतकरी भुमीहीन होणार असल्याने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा

  महादेव जाधव, शेतकरी खुंटेवाडी ता. तुळजापूर 

शक्तिपीठ महामार्गासाठी तुळजापूर तालुक्यातील खुटेवाडीसह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तसेच बहुसंख्य शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे या ‘शक्तिपीठ' महामार्गाला या भागातील शेतकऱ्यांचा ठाम विरोध असून या परिसरातील शेती ही पूर्णपणे बागायती शेती असून शासनाने आखलेल्या या व्यावसायिक प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे कधीही न भरून होणारे नुकसान होत आहे. या महामार्गाचे काम स्थगित केल्याचे आश्वासन देऊनही महामार्गासाठी‌ शेतकऱ्यांना बेसावध ठेवून या महामार्गासाठी पोलीस बळाचा वापर करून सर्वे केला जात आहे. या महामार्गाचे काम रेटण्याचा प्रयत्न निषेधार्ह असून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा,
    महादेव जाधव,
शेतकरी खुंटेवाडी ता.तुळजापूर

Post a Comment

0 Comments