मुरूम /प्रतिनिधी
जिल्हा बँकेस शासकीय भागभांडवल ७४ कोटी रुपये मिळावेत, तेरणा व श्री तुळजाभवानी कारखान्यांसाठी शासनाने घेतलेल्या हमीची २४२ कोटी रुपये, २०२१-२२ चे ९५६.१९ लाख रुपये बॅंकेस द्यावेत, तेरणा व श्री तुळजाभवानी कारखान्याकडील जमीन-विक्री करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अडचणीतील शेतक-यांना नव्याने कर्ज वितरण करण्यासाठी खास बाब म्हणून बॅकेस बिनव्याजी २०० कोटी रुपयाचे सॉफ्टलोन मंजूर करावे, अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे. अशी माहिती राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील यांनी सोलापूर येथे भेट घेऊन जिल्हा बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी निवेदन दिले. यामध्ये जिल्हा बँकेने शासकीय भागभांडवल ७४ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केलेला असून सदर प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.
सदर प्रस्ताव मंजूर करुन बँकेस शासकीय भागभांडवल ७४ कोटी रुपये मिळावेत. तेरणा व श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्यांना कर्जवाटप करतेवेळी शासनाने घेतलेल्या हमीपोटीची रक्कम २४२ कोटी रुपये शासनाकडून येणे असून सदरची रक्कम बँकेस तात्काळ मिळावी. सन २०२१-२२ चे पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान ३ टक्केची रक्कम ५१८.५६ लाख व २.५० टक्केची रक्कम रुपये ४६७ .६३ लाख अशी एकूण ९५६.१९ लाख रुपये रक्कम शासनाकडून न मिळाल्यामुळे शासनाकडे याबाबतीत पुर्नविचार याचिका देखील दाखल केली असून ती प्रलंबित आहे. सदर याचिका निकाली काढून सदर रक्कम बँकेस प्राप्त झाल्यास काही प्रमाणात बँकेस आर्थिक दिलासा मिळु शकतो. भाडेतत्वावर दिलेल्या तेरणा व श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्याकडील जमीन विक्री करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी. जेणेकरून बँकेस पुर्वपदावर येण्यासाठी मदत होईल. तसेच या क्षेत्रावर जी शासनाची विविध देयकामधून सवलत मिळण्यासाठी शासन दरबारी बैठक घेऊन यावर योग्य तो मार्ग काढण्यात येईल.
धाराशिव जिल्हामध्ये सध्या अतिवृष्टी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये सापडलेला आहे. सदर शेतक-यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी नव्याने कर्ज वितरण करणे आवश्यक आहे. सध्या जिल्हा बँकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे सदर शेतक-यांना बॅक कर्ज वितरण करण्यास सक्षम नाही. तेव्हा खास बाब म्हणून या बॅकेस बिनव्याजी २०० कोटी रुपयाचे सॉफ्टलोन मंजुर करावे, अशी मागणी केली आहे. याप्रसंगी दरेकर यांनी पुढील आठवड्यात बैठक बोलावून जिल्हा बँकेला शासन स्तरावरुन आवश्यक ते अर्थसहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
0 Comments