मुंबई:-(दि.14) महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्या उत्तरोत्तर प्रगतीपथावर असून वीज उद्योगामध्ये उभ्या ठाकलेल्या आवाहनांचा सामना करीत निर्मिती, पारेषण व वितरण या तिन्ही बाबतीत राज्याच्या गरजेला अनुसरून अपेक्षित कार्य करीत आहेत. अनेक अडचणींवर मात करून तिन्ही वीज कंपन्यांचे कर्मचारी अहोरात्र काम करून संपूर्ण राज्याला दर्जेदार व अखंडीत वीज पुरवठा करीत आहेत. महानिर्मिती कंपनीला गुणवत्तायुक्त कोळसा प्राप्त होणे अत्यंत कठीण असताना व त्यामुळे वीज निर्मितीचा खर्च नियंत्रित ठेवणे हे आवाहनात्मक कार्य असूनही सद्यस्थितीत महानिर्मिती कंपनीचे सर्व संच हे कमीत कमी खर्चात वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करीत आहेत. महापारेषण ही कंपनी देशातील दुसऱ्या क्रमांकाची विद्युत पारेषण कंपनी असून अलिकडेच या कंपनीने उच्च तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांचा वापर अतिशय सक्षमतेने केल्यामुळे सदर कंपनी देशातील एकमेव प्रगत अशी वीज वहन व्यवस्था निर्माण करणारी कंपनी ठरली आहे.
महावितरण कंपनीसमोर निर्माण झालेल्या आवाहनांना सामोरे जाताना सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनी प्रशासनाच्या अपेक्षेनुसार कार्य करून अनेक बाबतीत गौरव प्राप्त करून महत्तम महसुल प्राप्त करून दिला आहे. हे करताना कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली असतानाही वीज ग्राहकांना अखंडीत व दर्जेदार वीज पुरवठा करण्याचे साहसी कार्य महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेले आहे. त्याचप्रमाणे भविष्यात निर्माण होऊ शकणारी स्पर्धात्मक परिस्थिती लक्षात घेता तिन्ही वीज कंपन्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्व वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संकल्पबद्ध झाले आहेत.
अशा परिस्थितीत सर्व अडथळ्यांना पार करून राज्यातील शासकीय वीज उद्योगाला पुढे घेऊन जाण्यासाठी कर्मचारी व व्यवस्थापन यांचेमध्ये परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना सकारात्मक प्रोत्साहन देणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे.
या दृष्टिकोणातून तिन्ही वीज कंपन्यातील सर्व श्रेणी व गटातील वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांचेसह तिन्ही वीज कंपन्यांमध्ये काम करणारे कंत्राटी कामगार यांनी केलेल्या लक्षणीय कार्याची दखल घेवून येणाऱ्या दिवाळीपूर्वी रूपये ३० हजार सानुग्रह अनुदान म्हणून अदा करून प्रोत्साहित करावे, अशी मागणी तिन्ही कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक यांचेकडे संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके सरचिटणी संजय मोरे यांनी संघटनेच्या पञाद्वारे केली आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष बापू जगदे,दीपक कोथले,सिद्दिक मुलाणी गौतम मोटे,सचिन शिंदे यानी माहिती दिली.
0 Comments