तुळजापूर/उमाजी गायकवाड
धाराशिव जिल्ह्यातील बळीराजाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती व्यवसायाला समृद्धीच्या वाटेवर नेण्यासाठी तुळजापूर येथे जिल्हास्तरीय 'श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव 2026' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 24 आणि 25 फेब्रुवारी 2026 या दोन दिवसांच्या कालावधीत नळदुर्ग रोडवरील तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव संपन्न होणार असून, 60 हून अधिक दालने आणि विशेष प्रदर्शने हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहेत.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार असून, यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
महोत्सवाची वैशिष्ट्ये आणि आकर्षणे:
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना थेट ग्राहकांशी जोडणे या उद्देशाने आयोजित या कृषी महोत्सवात अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतील:
60 दालने: यामध्ये 35 शासकीय योजनांची दालने आणि उर्वरित खाजगी संस्थांची उत्पादने व सेवांची दालने असतील.
उस्मानाबादी शेळी प्रदर्शन: जिल्ह्याची ओळख असलेल्या उस्मानाबादी शेळीचे विशेष दालन या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान: कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारे ऊस उत्पादन व्यवस्थापन, ड्रोन तंत्रज्ञान आणि निर्यातक्षम केळी व आंबा लागवडीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाईल.
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री: शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकण्यासाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महत्त्वाचे परिसंवाद: रेशीम शेती, बायोचार निर्मिती, रब्बी पीक व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगांवर आधारित सविस्तर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
बळीराजाच्या प्रगतीसाठी मोठी संधी
या महोत्सवात कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे आणि विविध शासकीय विभागांचा सहभाग असणार आहे. महसूल, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, आरोग्य आणि सामाजिक कल्याण अशा विविध विभागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय योजनांची एकाच छताखाली माहिती मिळणार आहे. विशेषतः महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठीही 'माविम'च्या माध्यमातून विशेष दालने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
प्रशासनाचे आवाहन:
"धाराशिव जिल्ह्यातील बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी शेतीमध्ये उच्च तंत्रज्ञान आणि नवनवीन व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे काळाची गरज आहे. ही संधी जाणून घेण्यासाठी आणि आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवास अवश्य भेट द्यावी," असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे व तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
आमच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा – 'Only न्युज धाराशिव'
0 Comments