Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

🚩“शिवरायांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत” – प्रा. किरण सगर यांचे ठाम प्रतिपादन🚩

मुरुम (प्रतिनिधी):
देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे उलटली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणत्याही लोकशाही सरकारला कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही. उलट शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे, असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यकारणी सदस्य प्रा. किरण सगर यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. 19) श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था व महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘वाचन कट्टा’चे उद्घाटन प्रा. सगर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पतसंस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शिवशरण वरनाळे होते.

यावेळी माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, महाराष्ट्र पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, संस्थेचे सचिव कमलाकर जाधव, संचालक अमृत वरनाळे, विजय काशेट्टी, अशोक जाधव, श्रीशैल बिराजदार, शिवराज समन, बाबासाहेब पाटील, वंदना सोनवणे, इंद्रजित लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्रा. सगर म्हणाले, “शिवरायांचे लोककल्याणकारी राज्य हे खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य होते. त्यांनी वतनदार, महसूल ग्रामाधिकारी यांच्या भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलली. वसुलीची मनमानी पद्धत बंद करून नियमबद्ध सारा वसुली सुरू केली. शेतकऱ्यांना बी-बियाणे, मशागत यासाठी व्यवस्था केली आणि जमिनीची मोजणी करून योग्य कर निश्चित केला.”तसेच सैनिकांना दिलेला आदेश उद्धृत करत त्यांनी सांगितले, “शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका; पाणवठ्यातून गरजेपेक्षा जास्त पाणी घेऊ नका; फुकट काही घेऊ नका.” आजच्या शासनव्यवस्थेवर भाष्य करताना त्यांनी विकासाच्या नावाखाली शेतकरी व आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींकडे वळवल्या जात असल्याची खंत व्यक्त केली.

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलांना संपूर्ण संरक्षण होते. शिवजयंतीच्या निमित्ताने अन्याय, अत्याचार आणि जुलमी सत्तेविरोधात ठाम राहण्याची, तसेच सर्व धर्म-पंथातील लोकांनी एकोपा व सद्भावनेने राहण्याची प्रतिज्ञा करूया, असे आवाहन त्यांनी केले.
मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. महेश मोटे यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ‘वाचन कट्टा’ ही संकल्पना महत्त्वाची ठरेल, असे सांगितले. दत्तात्रय इंगळे यांनी पतसंस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला.

कार्यक्रमासाठी शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टी, सचिन कंटेकुरे, नेहा शेवाळकर, राजेंद्र मुदकण्णा, संतोष मुदकण्णा, महांतय्या स्वामी, गुंडेराव गुरव आदींनी पुढाकार घेतला. प्रास्ताविकात संस्थेचा लेखाजोखा व विषयपत्रिकेचे वाचन करण्यात आले. सूत्रसंचालन किरण गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन मनीष मुदकण्णा यांनी केले.

कार्यक्रमास नागरिक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 मुरुम (ता. उमरगा) येथील बसव भवन येथे वाचन कट्ट्याचे उद्घाटन करताना किरण सगर, शिवशरण वरनाळे, दत्तात्रय इंगळे, सुधीर पंचगल्ले, महेश मोटे, डॉ. नितीन डागा व अन्य मान्यवर.

Post a Comment

0 Comments