Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

महावितरणचा ग्राहकांना 'स्मार्ट' 'शॉक'; थकीत बिलापोटी परीक्षा काळातच वीज गुल! अचूक बिलिंग आणि दिवसा वीज वापरणाऱ्या ग्राहकांना फायदाच महावितरणकडून दावा


तुळजापूर | Only न्युज धाराशिव 
राज्यात एकीकडे महावितरणकडून 'स्मार्ट मीटर'चे फायदे सांगून त्याचे मोठ्या प्रमाणावर समर्थन केले जात आहे, तर दुसरीकडे याच स्मार्ट प्रणालीमुळे सामान्य वीज ग्राहक भरडले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. ऐन दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना, कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ किरकोळ थकबाकीसाठी संगणकीय प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

'चोर सोडून संन्यासाला फाशी?' ग्राहकांचा संतप्त सवाल जिल्ह्यातील अनेक भागांत महावितरणच्या या पक्षपाती कारभाराविरोधात ओरड सुरू आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार, ज्यांच्याकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे किंवा जे सर्रास 'आकडे' टाकून वीज चोरी करत आहेत, त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. मात्र, प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या पण काही कारणास्तव किरकोळ थकबाकी राहिलेल्या सामान्य कुटुंबांची वीज मात्र क्षणात कापली जात आहे. विशेषतः परीक्षा काळात रात्रीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे यामुळे मोठे नुकसान होत आहे. "आकडे टाकणारे उजेडात आणि बिल भरणारे अंधारात," अशी विदारक स्थिती सध्या पाहायला मिळत आहे.

काय आहे महावितरणची बाजू?
या प्रकरणावर महावितरणने आपली तांत्रिक भूमिका स्पष्ट केली आहे. वाढत्या थकबाकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महावितरणने 'ऑटो डिस्कनेक्शन' मोहीम तीव्र केली आहे.
महावितरणच्या मते:
रिमोट डिस्कनेक्शन: स्मार्ट मीटरमुळे आता प्रत्यक्ष कर्मचाऱ्याला जाऊन लाईन तोडण्याची गरज उरलेली नाही. बिलाची मुदत संपल्यावर संगणकीय प्रणालीद्वारे 'रिमोट' पद्धतीने वीजपुरवठा बंद केला जातो.
पारदर्शकता आणि बचत: या प्रणालीमुळे मनुष्यबळ, वेळ आणि खर्चाची मोठी बचत होत आहे. तसेच मीटरमध्ये छेडछाड (टॅम्परिंग) झाल्यास त्याची नोंद त्वरित सर्व्हरवर होते, ज्यामुळे वीज चोरीला लगाम बसेल.
ग्राहकांसाठी फायदे: अचूक बिलिंग आणि दिवसा वीज वापरणाऱ्यांना प्रति युनिट 80 पैसे सवलत देऊन ग्राहकांचा फायदाच केला जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

'स्मार्ट' सिस्टिममध्ये माणुसकी हरवली का?
महावितरण जरी या प्रणालीचे कौतुक करत असले, तरी जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे. "थकबाकी भरल्यावर वीज लगेच सुरू होते हे तांत्रिकदृष्ट्या खरे असले, तरी परीक्षेच्या काळात रात्रीच्या वेळी वीज गेल्यावर पालकांनी पैसे कोठे भरायचे आणि विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार?" असा सवाल ग्राहक विचारत आहेत.

महावितरणने या तंत्रज्ञानाचा वापर करताना किमान विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा आणि संवेदनशील काळाचा विचार करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा, या 'स्मार्ट' अन्यायविरोधात मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे.

Post a Comment

0 Comments