मुरुम/प्रतिनिधी
पीएमश्री जि. प. केंद्र प्राथमिक शाळा, केसरजवळगा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. सहशिक्षक सुनिल राठोड, संजीव भोसले, सुंकेवार सर, अनंत वाघमोडे, क्रीडा शिक्षक ढोबळे सर तसेच सहदेव बोडरे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संपूर्ण शाळा परिसर “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
यानंतर विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. लहानग्या विद्यार्थ्यांनी महाराजांच्या शौर्यगाथा, स्वराज्य स्थापनेचे ध्येय आणि त्यांची दूरदृष्टी याबाबत प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित शिक्षक व पालक भारावून गेले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक वेशभूषा परिधान करून शिवकालीन पराक्रमाचे दर्शन घडवले. तलवार, ढाल, भगवा फेटा आणि पारंपरिक पोशाखामुळे वातावरणात ऐतिहासिक रंग भरला. विविध देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रत्येक सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
याप्रसंगी सहशिक्षक सुनिल राठोड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी महाराजांचे बालपण, राजमाता जिजाऊ यांचे संस्कार, स्वराज्य स्थापनेची जिद्द, पराक्रम आणि कुशल प्रशासन याविषयी मार्गदर्शन केले. “शिवरायांचे विचार जीवनात अंगीकारल्यास आपण आदर्श नागरिक बनू शकतो,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल राठोड यांनी केले, तर सहदेव बोडरे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
या जयंती उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान व प्रेरणा निर्माण झाली असून, शाळेत उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले.
0 Comments