काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भीम नगरमधील बुद्ध विहार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. महापुरुषांच्या विचारांची सांगड घालत भीम सैनिकांनी शिवरायांना अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी दलित मित्र नंदू बनसोडे, पांडुरंग ढाले, अनिल बनसोडे, भिमाशंकर घोंघडे आणि बाळु साबळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
शिवरायांच्या शौर्याचा आणि समतेचा जागर
कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना दलित मित्र नंदू बनसोडे यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर आपल्या खास शैलीत प्रकाश टाकला. त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असल्याचे सांगून "शिवराय केवळ एका धर्माचे नव्हते, तर ते अठरापगड जातींना सोबत घेऊन चालणारे लोकराजे होते. त्यांच्या स्वराज्यात जाती-पातीला जागा नव्हती, तर केवळ माणुसकी आणि निष्ठेला महत्त्व होते," असे मत त्यांनी मांडले.
स्त्रियांचा सन्मान हाच स्वराज्याचा पाया: महाराजांनी परस्त्रीला मातेसमान मानले. "ज्या काळात महिला सुरक्षित नव्हत्या, त्या काळात शिवरायांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी कठोर कायदे केले आणि आदर्श घालून दिला," असे सांगत त्यांनी आजच्या काळात या विचारांच्या निकडीवर भर दिला.
शौर्य आणि निष्ठा: शिवरायांचे शौर्य हे केवळ तलवारीचे नव्हते, तर ते बुद्धी आणि नियोजनाचे होते. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्याला शिवचरित्रातून मिळते, असेही बनसोडे यांनी नमूद केले.
उपस्थित मान्यवर
या सोहळ्याला नंदू बनसोडे यांच्यासह पांडुरंग ढाले, अनिल बनसोडे, भिमाशंकर घोंघडे, बाळु साबळे, शषप्पा बनसोडे, बाबासाहेब साबळे, बाळु लोंढे, अनुराधा बनसोडे, रंजना शेरखाने, ताई सुरते, राजाबाई बनसोडे, राजु बनसोडे यांसह भीम नगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments