Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

एकलव्य विद्या संकुलातील विद्यार्थ्यांचे लाडके व कौटुंबिक वातावरण जपणाऱ्या व दहा महिन्यांच्या सेवेत विद्यार्थ्यांचे मन जिंकलेल्या शिक्षक नवनाथ बिराजदार सरांचा सन्मानपूर्वक निरोप

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ, यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलाच्या माध्यमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक नवनाथ बिराजदार यांचा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती निमित्त सन्मानपूर्वक निरोप समारंभ उत्साहात पार पडला.

सहशिक्षक नवनाथ बिराजदार  गेल्या दहा महिन्यांपासून एकलव्य विद्या संकुलात अतिरिक्त शिक्षक म्हणून कार्यरत होते. अल्प कालावधीतच त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी निर्माण करून त्यांची मने जिंकली. विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक म्हणून ते सर्वांच्या विशेष प्रेमास पात्र ठरले.

कार्यक्रमाला संस्थेचे कार्यवाह विवेक अयाचित प्रमुख उपस्थित होते. संस्थेच्या वतीने तसेच माध्यमिक शाळेच्या वतीने बिराजदार  व त्यांच्या पत्नीचा पारंपरिक पेहराव, साडी व देवीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. प्राथमिक शाळेच्या कर्मचाऱ्यांनीही देवीची मूर्ती भेट देऊन त्यांचा गौरव केला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर यांनी केले. विठ्ठल म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनी प्राची पाटोळे, जानवी राजपूत, दत्तात्रय खराडे व आदिती सुपलकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत बिराजदार सरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

“एकलव्य विद्या संकुल हे विद्यार्थ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे एक कुटुंब आहे."
आपले मनोगत व्यक्त करताना सेवानिवृत्त शिक्षक नवनाथ बिराजदार  म्हणाले की, “एकलव्य विद्या संकुल हे विद्यार्थ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे एक कुटुंब आहे. येथे कौटुंबिक वातावरण असून सर्व कर्मचारी संस्थेच्या ध्येयासाठी मनापासून कार्य करतात. या शाळेत घालवलेला काळ माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक आणि आनंददायी होता.” तसेच भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांबद्दल आत्मीयता आणि तत्परता कशी असावी, हे येथे शिकायला मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे कार्यवाह विवेक अयाचित यांनी बिराजदार सरांना सेवानिवृत्तीबद्दल शुभेच्छा देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णासाहेब मगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष बनसोडे यांनी केले. या प्रसंगी विवेक अयाचित, अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे, फुलाजी ताटी कुंडलवार, संगीता पाचंगे, गोविंद सोमानी, सुमन सोमानी, सर्व शिक्षक-कर्मचारी, बिराजदार सरांचा परिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!

Post a Comment

0 Comments