काटी/उमाजी गायकवाड
संकटाच्या काळातही ध्येय निश्चित असल्यास यश संपादन करता येते, हे तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रुद्राक्ष राहुल साळुंके याने दाखवून दिले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालात रुद्राक्षची पुणे येथील नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. त्याला या परीक्षेत तब्बल 97.50 टक्के गुण मिळाले आहेत. मात्र, या आनंदाच्या बातमीने साळुंके कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत.
रुद्राक्षचे वडील कै. राहुल जगन्नाथ साळुंके आणि आई सुप्रिया साळुंके मुलांच्या भवितव्यासाठी पुण्यात स्थायिक झाले होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी राहुल साळुंके यांचे आकस्मिक निधन झाले. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सुप्रिया साळुंके या शिक्षिका म्हणून कार्यरत असून, पतीच्या अकाली जाण्याने त्यांच्या खांद्यावर घराची आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आली.
अशा कठीण परिस्थितीतही रुद्राक्षने अभ्यास चालू ठेवला आणि पप्पांचे स्वप्न पूर्ण केले. "माझ्या पप्पांचे स्वप्न पूर्ण झाले," अशी प्रतिक्रिया चि. रुद्राक्ष याने दिली आहे. रुद्राक्षच्या या यशाबद्दल त्याचा आई, आजोबा, आजी, चुलते, मामा आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी सत्कार केला. यावेळी सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि राहुल साळुंके यांच्या आठवणीने दुःख दाटून आले होते. रुद्राक्षचे हे यश संपूर्ण काटी गावासाठी अभिमानास्पद आहे.
माझ्या पतीचे स्वप्न रुद्राक्षने पुर्ण केल्याचे समाधान आहे
-आई सुप्रिया राहुल साळुंके
"माझ्या पतीचे स्वप्न होते की, रुद्राक्षने उच्च शिक्षण घेऊन नाव कमवावे. आज रुद्राक्षने नवोदय विद्यालयात निवड होऊन त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले आहे. आम्हाला त्याच्या यशाचा खूप अभिमान आहे."
"हे यश आमचे सर्वांचे आहे. माझे पती सतत आम्हाला प्रोत्साहन देत असत. त्यांच्या जाण्याने आम्हा सर्वांना खूप दुःख झाले आहे, पण रुद्राक्षच्या यशाने आम्हाला थोडे तरी सुख मिळाले आहे."
"रुद्राक्षने खूप कष्ट घेतले. अभ्यास करताना त्याला अनेक अडचणी आल्या, पण त्याने कधीही हार मानली नाही. मला खात्री आहे की, तो भविष्यातही असेच यश संपादन करेल."
आई सुप्रिया राहुल साळुंके,काटी
ता.तुळजापूर
0 Comments