Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आस्मानी संकट! खुंटेवाडीत अवकाळीचा तांडव; हाता तोंडाशी आलेला केळीचा घास हिरावलाबळीराजाचे स्वप्न मातीत; शासनाने तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी परिसरात गुरुवारी (दि. १९) झालेल्या अचानक अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. येथील कष्टाळू शेतकरी मोहन जाधव यांच्या गट नंबर ८४ मधील एक हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागेचे अतोनात नुकसान झाले असून, काढणीला आलेली केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जाधव कुटुंबीय हवालदिल झाले आहे.

घामाचे दाम पावसाने नेले
शेतकरी मोहन जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कर्ज काढून आणि रात्रंदिवस शेतात राबून या केळी बागेचे संगोपन केले होते. बागेला खते, औषध फवारणी आणि मशागतीसाठी मोठा खर्च केला होता. केळीचे पीक आता कुठे बहरात आले होते आणि काही दिवसातच उत्पन्नाची आशा होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाने या आशेवर पाणी फेरले आहे. वादळ इतके भयानक होते की, जड झालेली केळीची झाडे मुळासकट उखडून पडली आहेत.

शेतकऱ्यांपुढील कठीण पेच
केवळ झाडेच पडली नाहीत, तर पुढील हंगामासाठी केलेली गुंतवणूकही वाया गेली आहे. "मुलाबाळांप्रमाणे बागेला जपलं, पण एका तासाच्या पावसाने सगळं उद्ध्वस्त केलं," अशा शब्दांत मोहन जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वर्षभराची मेहनत मातीत गेल्याने आता जगायचे कसे आणि कर्जाची परतफेड कशी करायची, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

महसूल आणि कृषी विभागाने विलंब न लावता प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करुन या अस्मानी  नैसर्गिक आपत्ती काळात केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पदरात पाडावी,जेणेकरून कोसळलेला बळीराजा पुन्हा उभा राहू शकेल यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून मोहन जाधव यांना हेक्टरी भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी खुंटेवाडी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments