Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री मा. रामदासजी आठवले यांची नुकतीच तिसऱ्यांदा खासदार म्हणून आणि पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने, तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रसिद्ध दलित मित्र आणि समाजसेवक नंदू बनसोडे यांनी मुंबईत जाऊन मा. आठवले यांची भेट घेतली.
बांद्रा, मुंबई येथील मा. रामदास आठवले यांच्या शासकीय कार्यालयात हा विशेष भेट व सत्कार समारंभ पार पडला. यावेळी नंदू बनसोडे यांनी मा. आठवले यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार केला. तसेच, त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस 'शुभ संदेश पत्र' देऊन शुभेच्छा दिल्या.
मा. आठवले यांच्या पुन्हा मंत्रीपदी निवडीबद्दल दलित मित्र नंदू बनसोडे यांनी आपले मत व्यक्त केले. "रामदासजी आठवले साहेब दलित, शोषित आणि पीडित वर्गासाठी नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यांची पुन्हा मंत्रीपदी निवड झाल्यामुळे समाजाला मोठा आधार मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय विभागाचे काम अधिक प्रभावीपणे होईल, असा आम्हाला विश्वास आहे."
रामदास आठवले यांनीही नंदू बनसोडे यांच्या कार्याचे कौतुक केले. "नंदू बनसोडे हे दलित मित्राच्या भूमिकेत समाजात चांगले काम करत आहेत. त्यांच्या सत्कार आणि शुभेच्छांसाठी मी त्यांचे आभार मानतो. मी दलित आणि इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्नशील राहीन," असे मा. आठवले म्हणाले.
या भेटीमुळे नंदू बनसोडे आणि तुळजापूर तालुक्यातील दलितांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला आहे. मा. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली दलित आणि इतर मागासवर्गीयांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असा त्यांना विश्वास आहे.
0 Comments