मुरुम | प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील पदव्युत्तर विभागातील करिअर कट्टा उपक्रमातील विद्यार्थिनी साक्षी जमादार यांनी स्पर्धा परीक्षा (डीवायएसपी) तयारीदरम्यान आलेले अनुभव, संघर्ष, आठवणी आणि आत्मविश्वासाचा प्रवास ‘स्वतःशी चाललेली वाट’ या ललित लेखसंग्रहातून शब्दबद्ध केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते संपन्न झाले.
महाविद्यालयात आयोजित या प्रकाशन सोहळ्यास उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, पदव्युत्तर कला शाखा समन्वयक डॉ. सन्मुख मुच्छटे, करिअर कट्टा समन्वयक डॉ. एस. पी. पसरकल्ले, डॉ. चंद्रसेन करे तसेच विविध विभागांचे प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी, “स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एखादी विद्यार्थिनी पुस्तक प्रकाशित करते, ही बाब महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांनी यापासून प्रेरणा घेऊन वाचन, लेखन आणि सर्जनशीलतेकडे वळावे,” असे आवाहन केले.
उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले यांनी साक्षी जमादार यांच्या लेखनातील भावनिकता, प्रामाणिकपणा आणि वास्तवदर्शी शैलीचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साक्षी जमादार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. पी. पसरकल्ले यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सी. डी. करे यांनी मानले.
0 Comments