काटी|प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी येथे एका १३ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिचा सख्ख्या चुलत्यानेच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तामलवाडी पोलिसांनी कौशल्याने तपास करत अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
दिनांक २८ फेब्रुवारी रोजी महादेव माने (रा. गवळेवाडी) यांनी आपली १३ महिन्यांची मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तामलवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. अज्ञात व्यक्तीने मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
असा लागला छडा
तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचा चुलता शंकरेश्वर माने याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने २७ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास मुलीला घरातून उचलून नेले. शेतात तिचा गळा दाबून खून केल्यानंतर कोयत्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी ते पोत्यात भरून एका चारीमध्ये पुरून टाकले.
हत्येचे कारण धक्कादायक
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या भावाची पत्नी काही दिवसांपूर्वी परपुरुषासोबत पळून गेल्याने तो संतापात होता. तसेच, संबंधित चिमुकली ही आपल्या भावाची नसल्याचा संशय त्याला होता. याच रागातून त्याने हे अघोरी पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शाफाकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, हवालदार जुबेर काझी, आकाश सुरनर, नितीन भोसले, सूरज नरवडे, नझीर बागवान, उमेश माने, तुराब शेख आणि मनोज गोबाडे यांच्या पथकाने अत्यंत क्लिष्ट असलेला हा गुन्हा २४ तासांत उघडकीस आणला. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
0 Comments