"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सावित्रीबाई फुले मागासवर्गीय सामाजिक व शैक्षणिक सेवाभावी संस्था संचलित, 'मणाल इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. चिमुकल्यांच्या कलागुणांनी आणि बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली.
मान्यवरांचा गौरव आणि प्रतिमा पूजन
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान तुळजापूर पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख यांनी भूषवले. काटी गावाला प्रथमच पंचायत समितीचे सभापती पद मिळाल्याबद्दल गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. आशाताई सुजित हंगरगेकर आणि मुख्याध्यापिका रुबीना जुबेर शेख यांच्या हस्ते सभापतींचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच, मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी (गृह विभाग, मुंबई) पदी निवड झाल्याबद्दल गावाचे सुपुत्र जुनेद नासेर काझी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
आदर्श पुरस्कारांचे वितरण
संस्थेच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे मानाचे तीन पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले:
स्टुडन्ट ऑफ द इयर (२०२५-२६): कु. ओवी कृष्णात कदम
पेरेंट्स ऑफ द इयर (२०२५-२६): सौ. रेशमा सादिक शेख
टीचर ऑफ द इयर (२०२५-२६): सौ. शोभा संभाजी ढगे
(पुरस्कार विजेत्यांना स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.)
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
स्नेहसंमेलनात एकूण ३३ विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. बालकलाकारांच्या नृत्याविष्कारावर पालकांनी आणि ग्रामस्थांनी कौतुकाचा वर्षाव केला.
उपस्थित मान्यवर
या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भाले, शिवसेना युवा नेते ऋषिकेश अशोकराव मगर, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित किसन हंगरकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल गुंड, अमोल गावडे, शिवलिंगाणे घाणे, सुरज साळुंखे, कृष्णा कदम, युसूफ शेख, सादिक शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments