काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवार, दिनांक १० मार्च रोजी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा 'स्वयंशासन दिन' मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षक आणि प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून शाळेचे कामकाज यशस्वीपणे हाताळले.
या विशेष दिनानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापकपदाची जबाबदारी चि. रुद्र पांडुरंग शिंदे याने, तर उपमुख्याध्यापक म्हणून सोहम राम बागल याने कामकाज पाहिले. या बाल-मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिवम लोहार, चेतन मोरे, आराध्या शिंदे, आरती गिरी, स्वरा फंड आणि श्रावणी शिंदे यांनी शिक्षक बनून इयत्ता पहिली ते तिसरीच्या वर्गांना अतिशय प्रभावीपणे अध्यापन केले.
शाळेप्रती कृतज्ञता आणि निरोप
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय स्मृती जपण्यासाठी आणि शाळेप्रती कृतज्ञता (उतराई) म्हणून शाळेला वस्तू भेट दिली. तसेच, इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांमार्फत सर्व शालेय मित्र-मैत्रिणींसाठी 'स्नेहभोजना'चे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व चौथीच्या वर्गाला पुढील शिक्षणासाठी भावपूर्ण निरोप दिला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. घोडके डी.टी. यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका श्रीमती भुतेकर एस.आर. यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि शिस्तीचे दर्शन घडले.
0 Comments