"ओन्ली न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
व्यावसायिक व्याप आणि कौटुंबिक सुखाचा त्याग करून समाजासाठी समर्पित भावनेने कार्य करणे ही आजच्या काळात दुर्मिळ गोष्ट आहे. मात्र, नांदेड येथील उद्योजक गोविंद सोमाणी आणि त्यांच्या पत्नी सुमन सोमाणी यांनी तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील 'भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान' संकुलात सलग तीन वर्षे पूर्णवेळ सेवा देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निस्वार्थी सेवेचा गौरव करत, संस्थेच्या वतीने त्यांना नुकताच भावपूर्ण निरोप देण्यात आला.
नांदेड येथे प्लायवूडचा मोठा व्यवसाय आणि मोठा परिवार असतानाही, सोमाणी दाम्पत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सामाजिक कार्यासाठी स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतला होता. सर्व सुखसोयींपासून दूर राहत, त्यांनी यमगरवाडी प्रकल्पातील भटके विमुक्त समाजातील मुलांसाठी आपले आयुष्य समर्पित केले.
विद्यार्थ्यांमध्ये रुजवली बचतीची सवय
सोमाणी दाम्पत्याने केवळ अध्यापन किंवा मार्गदर्शनच केले नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. त्यांनी शाळेत 'बचत बँक' आणि 'ग्राहक भांडार' सुरू करून दुर्गम भागातील मुलांना बचतीचे महत्त्व पटवून दिले. तसेच भटक्यांच्या वस्त्यांवर प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
त्यागाची भावना प्रेरणादायी : डॉ. अभय शहापूरकर
या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर होते. "सोमाणी काका-काकूंनी घरचा त्याग करून दिलेली सेवा ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समाजात त्यागाची भावना कमी होत असताना त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे," अशा शब्दांत डॉ. शहापूरकर यांनी गौरव केला.
संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सोमाणी दाम्पत्याचा पारंपरिक पेहराव आणि आई तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. "यमगरवाडी हे आमच्यासाठी घरच आहे. आम्ही येथून केवळ आठवणी नाही, तर आयुष्यभरासाठी सेवेची शिदोरी घेऊन जात आहोत," अशा भावना सोमाणी यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी कार्यवाह विवेक अयाचित, कोषाध्यक्ष नरेश पोटे, संघटनमंत्री राहुल चव्हाण, विभाग प्रचारक राजेश संन्याशी, डॉ. प्रणिता गडेकर, ॲड. जनक पाटील, सोलापूर येथील भुतडा परिवार आणि मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे यांनी केले. अण्णासाहेब कोल्हटकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर हरीश मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन संगीता पाचंगे यांनी केले.अनिल घुगे, साक्षी धुरपाडे व शंकर चव्हाण यांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.
0 Comments