"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवरील शेळगाव (आर) व वाणेवाडी या गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पानंद रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या रस्त्याच्या मोजणी व प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या पथकाने सोमवारी स्थळावर दाखल होत मोजणी प्रक्रिया हाती घेतली.
पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या या रस्त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटत होता. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तर शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तीन ते चार महिने ग्रामस्थांना अक्षरशः हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. मात्र आता प्रत्यक्ष कामाला गती मिळणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रक्रियेदरम्यान भूमी अभिलेख बार्शीचे प्रमोद जाधव, बिरोबा कांबळे तसेच तुळजापूर कार्यालयाचे अमृतराव पी. ए. व लोंढे यांनी उपस्थित राहून तांत्रिक मोजणी केली. सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत केले, तर ॲड. सुरेश गायकवाड यांनी शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन केले.
२०१७-१८ पासून सुरू असलेल्या या लढ्याला अखेर यश आले आहे. २४ एप्रिल २०२६ रोजी बसवेश्वर चौकातून मोजणीला प्रारंभ झाला. या ऐतिहासिक क्षणी दोन्ही गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेळगावचे सरपंच प्रकाश बादगुडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थांनी हजेरी लावली.
या रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे यांनी गेली आठ वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. निवेदने, अधिकाऱ्यांच्या भेटी आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या त्यांच्या चिकाटीमुळेच हा प्रकल्प प्रत्यक्षात येत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
0 Comments