अतनूर/मुरुम (प्रतिनिधी)
जळकोट तालुक्यातील अतनूर येथे श्री सदगुरू घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या १५० व्या संजीवनी समाधी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त धार्मिक उत्सवाला सुरुवात झाली असून परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि महाशिवपुराण कथांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात दररोज पहाटे रुद्राभिषेकाने कार्यक्रमांची सुरुवात होते. त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, गाथांवरील भजन, दुपारच्या सत्रात महापुराण कथा, सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन आणि पहाटे हरिजागर असा दैनंदिन कार्यक्रमांचा भरगच्च क्रम सुरू आहे.
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीमुळे कीर्तन सोहळ्याला विशेष रंगत चढत आहे.
भाविकांसाठी दररोज दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादाला विशेष प्रतिसाद मिळत आहे. चुलीवरच्या भाकरी, भोकरी वरण, गरमागरम वरण-भात, तसेच पारंपरिक गावरान पदार्थांच्या आस्वादाने भक्त तृप्त होत आहेत. या महाप्रसादातून भक्ती आणि गावकुसातील माणुसकीचा संगम अनुभवायला मिळत असल्याची भावना भाविक व्यक्त करत आहेत.
हा महाप्रसाद श्री तानाजीराव सोमुसे व श्री मनोहरराव मुगदळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला आहे. अन्नदात्यांनी अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने भोजन व्यवस्था केल्याबद्दल भाविकांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
या धार्मिक सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती लाभत असून अधिकाधिक भक्तांनी या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री काशी विश्वनाथ मंदिर संस्थान, भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ अतनूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments