"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव पंचायत समिती गणातील नागरिकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी आणि विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी सावरगाव येथे गुरुवारी एका विशेष 'जनता दरबार' व 'आढावा बैठकीचे' आयोजन करण्यात आले होते. जैन मंगल कार्यालयात सकाळी ९ वाजता पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
लोकसंवादातून सुशासनाकडे पाऊल
या जनता दरबारात सावरगावसह केमवाडी, गवळेवाडी, जळकोट वाडी, वडगाव, काटी आणि गंजेवाडी या गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. केवळ तक्रारी मांडणेच नव्हे, तर प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.
या प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा:
नागरिकांनी याप्रसंगी शासकीय योजनांमधील त्रुटी आणि प्रलंबित कामांचा पाढा वाचला. प्रामुख्याने खालील विषयांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने समाजकल्याण योजना: संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील नवीन लाभार्थी निवडीबाबतच्या अडचणी.
कृषी विभाग: 'पीएम किसान' योजनेचा हप्ता रखडलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी.
पायाभूत सुविधा: शेत रस्त्यांची दुरावस्था आणि पावसाळ्यापूर्वी करायची कामे.
आरोग्य व शिक्षण: ग्रामीण आरोग्य केंद्रातील औषध साठा आणि जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांचा अभाव आदी विविध विषयांवर सविस्तर व खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली.
अधिकारी व पदाधिकाऱ्यांची ग्वाही
सभापती विक्रमसिंह देशमुख यांनी प्रत्येक नागरिकाची बाजू ऐकून घेत उपस्थित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. "कोणताही सर्वसामान्य नागरिक सरकारी कामासाठी कार्यालयात चकरा मारणार नाही याची दक्षता घ्या," अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांनी तांत्रिक अडचणींचे जागीच निराकरण करून उर्वरित कामे कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी या मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस पंचायत समिती सदस्य संतोषदादा बोबडे, जिल्हा परिषद सदस्या सौ. आशा ब्रह्मदेव भाले, सीमा जोशी, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव जाधव,प्रभाकर मुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, विजय शिंगाडे, बाळासाहेब भाले,रोहित पाटील, अतुल पवार यांच्यासह विविध विभागांचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments