"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
मुरुम | प्रा. डॉ.सुधीर पंचगल्ले
"सामान्य कुटुंबातील मुलगा शिकायचा असेल तर जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवणे काळाची गरज आहे. आजची तरुण पिढी मोबाईलच्या व्यसनात इतकी गुरफटली आहे की, शाळेतील मुले रम्मी खेळून भिकारी होत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रत्येक गावाने शैक्षणिक वेळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला, तरच शाळा आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुधारेल," असे परखड मत प्रसिद्ध समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले.
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती व अधिक मासानिमित्त शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील दाळींब येथे बुधवारी (दि. १३) इंदोरीकर महाराजांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
'दंगलीत दिसलात तर १० वर्षे मागे पडाल'
तरुणांना मोलाचा सल्ला देताना महाराज म्हणाले की, "पोरांनो, मोर्चे, आंदोलने आणि दंगलींच्या भानगडीत अजिबात पडू नका. आज प्रत्येक क्षेत्रात पोलीस पडताळणी (Police Verification) अनिवार्य आहे. जर अशा दंगलींमध्ये तुमचे नाव आले, तर १० वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि तुमचे करिअर उद्ध्वस्त होईल. दोन मिनिटांच्या रागातील कर्माचे फळ आयुष्यभर भोगावे लागते, हे लक्षात ठेवा."
आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा
कुटुंब व्यवस्थेवर भाष्य करताना इंदोरीकर महाराज भावूक झाले. ते म्हणाले की, "बाप फाटके बनियन घालून, पायात चप्पल नसताना मुलाला शिकवतो. आई भाजीला तेल नसतानाही काबाडकष्ट करून मुलाचे शिक्षण पूर्ण करते. चुकीच्या मार्गाने कमावलेल्या पैशात समाधान नसते. आई-वडील आणि संतांची सेवा केली तरच देव भेटतो. व्यसनमुक्त मुलगा हीच खरी संपत्ती आहे. दारुड्याला मुलगी देणे म्हणजे कसायाला गाय देण्यासारखे आहे."
समाजप्रबोधनकार इंदोरीकर कीर्तनातील महत्त्वाचे मुद्दे:
मोबाईलचा अतिवापर: पालकांनीच लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊन त्यांना बिघडवले आहे. प्रत्येकाने दिवसातून किमान ५ तास मोबाईलपासून दूर राहावे.
शेतकरी आणि आरोग्य: शेतकऱ्यांनी शेतीला पूरक उद्योग करावा. महिलांनी वेळेवर जेवण करावे, वाढत्या आजारांचे ते मुख्य कारण आहे.
पैसा आणि प्रतिष्ठा: माणसाच्या अंगातील ताकद आणि खिशातील पैसा संपला की समाजातील किंमत संपते. संपत्तीचा उपभोग घ्यायला शिका.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता समितीचे विधानसभा सह-अध्यक्ष शरण बसवराज पाटील, जि.प. सदस्य रफिक तांबोळी, योगेश राठोड, अमर वाले, नगरसेवक राजू मुल्ला, सादिक चाकुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कीर्तन सोहळ्याला दाळींब परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
0 Comments