Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मोठी बातमी:धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या प्रकरणात रोचकरींना दिलासा; सुप्रीम कोर्टाने मंजूर केला जामीन; हर्सूल कारागृहातून झाली मुक्तता; २८ मे रोजी पुढील सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; समर्थकांचा जल्लोष

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर | विशेष प्रतिनिधी
तुळजापूरमधील राजकीय नेते देवानंद भाऊ रोचकरी यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा दिलासा दिला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. पंकज जावळे यांच्याशी संबंधित मारहाण प्रकरणात अडकलेल्या रोचकरी यांचा अंतरिम जामीन न्यायालयाने मंजूर केला असून, आता त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. या निकालामुळे रोचकरी समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

काय आहे प्रकरण?
२००७ मध्ये तुळजापूर नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. पंकज जावळे यांना शासकीय कार्यालयात घुसून मारहाण केल्याचा आरोप देवानंद रोचकरी यांच्यावर ठेवण्यात आला होता. प्रमाणपत्र आणि कंत्राटदाराचे बिल या कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडली होती. याप्रकरणी धाराशिव सत्र न्यायालयाने २२ डिसेंबर २०१५ रोजी रोचकरी यांना दोषी ठरवत कलम ३३२ नुसार एक वर्षाची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड, तर कलम ५०४ नुसार तीन महिने शिक्षा व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

उच्च न्यायालयाचा निकाल आणि सर्वोच्च धाव
सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात रोचकरी यांनी जानेवारी २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत त्यांचे अपील फेटाळून लावले होते. त्यानंतर त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली होती. अखेर या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

२८ मे रोजी पुढील सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. निशांत कटनेश्वरकर यांनी रोचकरी यांच्या वतीने भक्कम बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने काही अटी व शर्तींच्या अधीन राहून रोचकरी यांना पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील महत्त्वपूर्ण सुनावणी आता २८ मे रोजी होणार आहे.

न्यायालयाने जामीन मंजूर करताच रोचकरी यांची कारागृहातून सुटका झाली असून, तुळजापूरसह धाराशिव जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे.

Post a Comment

0 Comments