"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
सोलापूर | प्रतिनिधी
वैशाख अमावस्या आणि शनिवार अशा अनेक वर्षांनंतर जुळून आलेल्या अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र योगावर, सोलापूर येथील कर्णिक नगरस्थित प्रसिद्ध व जागृत 'शिळारूपी शनैश्वर देवस्थान' येथे शनि जन्मोत्सव सोहळा कमालीच्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. चाळिशी पार गेलेल्या कडक उन्हाची तमा न बाळगता, राज्यभरातून आलेल्या सुमारे ७० हजारांहून अधिक भाविकांनी शनैश्वराच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. सायंकाळी गोरज मुहूर्तावर झालेल्या पाळणा आणि गुलाल सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.
गोरज मुहूर्तावर जन्मोत्सव अन् पुष्पवृष्टी
शनिवार, दि. १६ मे रोजी शनिजयंतीनिमित्त मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली होती. पहाटे लघुरूद्राभिषेक, नवग्रह पूजा, गणेश पूजा, होमहवन आणि शनिस्तोत्र पठण असे विधी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. सकाळी ८ वाजता प्रभात आरती आणि दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती झाली.
मुख्य सोहळा सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी गोरज मुहूर्तावर पार पडला. सुवासिनी महिलांनी पारंपारिक पद्धतीने शनि जन्माचा पाळणा गायिला. "शनि जन्मला गं सखे, सूर्यपुत्र शनि जन्मला..." अशा गगनभेदी गर्जनांनी आणि जयघोषाने संपूर्ण कर्णिक नगर परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी उपस्थित भाविकांवर देवस्थानच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. दिवसभरात सुमारे ५ हजार भाविकांनी मूर्तीला तैलाभिषेक केला.
दिवाळीपासून 'अन्नछत्र' सुरू होणार: ॲड. सुरेशबापू गायकवाड
रात्री ८ वाजता उत्तर आरती देवस्थान समितीचे संस्थापक ॲड. सुरेशबापू गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना त्यांनी देवस्थानचे आध्यात्मिक महत्त्व आणि मंदिराचा पूर्व इतिहास विशद केला.
याप्रसंगी ॲड. गायकवाड यांनी भाविकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. 'अक्कलकोटच्या स्वामी समर्थ देवस्थानच्या धर्तीवर येत्या दीपावली-२०२६ मधील कार्तिक अमावस्येपासून कर्णिक नगर शनैश्वर मंदिरात प्राथमिक स्वरूपात प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत भव्य 'अन्नछत्र' (महाप्रसाद) सुरू करण्यात येणार आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. या अन्नछत्रासाठीची नाव नोंदणी देखील मंदिर प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
तुफान गर्दी, वाहतूक कोंडी अन् स्वयंसेवकांची कसरत
शनिजयंतीच्या निमित्ताने सोलापूर शहर आणि परिसरातून भाविकांचा महापूर ओसांडून वाहिला होता. रात्री १२ वाजेपर्यंत सुमारे ७० हजार भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसरातील जागा तुटपुंजी असल्याने भाविकांच्या वाहनांमुळे परिसरात काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, देवस्थानच्या शिस्तबद्ध स्वयंसेवकांनी अत्यंत कष्टाने गर्दीवर नियंत्रण ठेवत चोख व्यवस्था राखली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त ॲड. सुनील क्षीरसागर, रतन गायकवाड, नागेश शिरूर, विश्वास शिंदे, प्रभाकर फलमारी यांच्यासह प्रभाकर यादगिरी, ॲड. करण भोसले, ॲड. दादासाहेब जाधव, ॲड. युवराज आवताडे, ॲड. शिवानंद फताटे, ईशांत बोलाबत्तीन, तेजस क्षीरसागर, सनी गंगापुरे, सुनील कुमठेकर, महादेव मेतकु, सुनील साळुंखे व सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments