"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
दुर्गराज रायगड येथे ६ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीला राज्यभरात वेग आला असून, या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीची राज्यस्तरीय बैठक रविवारी पुण्यात उत्साहात पार पडली. शिवाजीनगर येथील ‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी’ (AISSMS) परिसरात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीराजे भोसले होते.
या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती, शहाजी राजे यांच्यासह महाराष्ट्रभरातील शिवभक्त उपस्थित होते. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या बैठकीत ६ जून रोजी होणाऱ्या भव्य सोहळ्याच्या विविध बाबींवर चर्चा झाली
राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शिवभक्त, जिल्हा समित्यांचे प्रतिनिधी आणि स्वयंसेवकांच्या उपस्थितीत सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीचा विचार करून सोहळा भव्य, शिस्तबद्ध आणि सुरक्षित पार पडावा यासाठी तब्बल ४० समित्यांची स्थापना करण्यात आली असून, त्यातील सहा प्रमुख समित्यांमध्ये हजारो स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत.
तुळजापूरच्या ऐतिहासिक परंपरेला उजाळा
छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीशी निगडित ऐतिहासिक परंपरेलाही बैठकीत विशेष महत्त्व देण्यात आले. रायगडावरील शिरकाई देवीला तुळजापूरहून कवड्यांची माळ अर्पण करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली असून, हा मान तुळजापूरला जाहीर करण्यात आला. छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शहाजीराजे यांच्या उपस्थितीत सोहळा समितीचे पदाधिकारी सतीश खोपडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
बैठकीस तुळजापूरहून उद्योजक व ‘पुजारी नगर फाऊंडेशन’चे अध्यक्ष गणेश पुजारी, पत्रकार उमाजी गायकवाड, राहुल जाधव, अभिजित बोंगाने, महेश गवळी, जीवन इंगळे, विशाल टोले, अण्णा भाराते, फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे आदींसह धाराशीव जिल्ह्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती आणि समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत सरकार यांचीही प्रमुख उपस्थिती होती. तुळजापूर येथील महेश गवळी यांच्या वतीने ५१ हजारांची देणगी देण्यात आली.
‘रायगड म्हणजे मराठी अस्मितेचे पवित्र स्थान’
यावेळी मार्गदर्शन करताना छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ‘माझा गड, माझी जबाबदारी’ हे ब्रीद अधोरेखित केले. “शिवराज्याभिषेक दिन हा केवळ उत्सव नसून स्वराज्याच्या विचारांचे स्मरण आणि प्रेरणा देणारा ऐतिहासिक सोहळा आहे. रायगड हा हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि मराठी अस्मितेचे पवित्र स्थान आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने शिस्त, स्वच्छता आणि ऐतिहासिक वारशाचे भान राखणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
सोहळ्यादरम्यान प्रशासनाशी समन्वय राखण्याचे आवाहन करत त्यांनी तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाच्या माध्यमातून शिवचरित्र योग्य स्वरूपात समाजासमोर मांडावे, असेही सांगितले.
‘शिवरायांचा वारसा जबाबदारीचा’
युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी गडकिल्ल्यांचे संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि समाजप्रबोधन यावर भर दिला.“छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ अभिमानाचा विषय नाही, तर तो आचरणात आणण्याची जबाबदारी आहे.
गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, तसेच महिलांना सुरक्षितता आणि सन्मानाचे स्थान मिळणे हीच शिवरायांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीच्या उत्तरार्धात संयोजन समितीकडून शिवभक्तांना स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. शेवटी शिवभक्तांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात शिवभक्तांकडून जाणून घेतले.
बैठकीमुळे उपस्थित शिवभक्तांमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
0 Comments