Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आरळी (बु.) ते कोळेगाव रस्त्याची दुरवस्था; तुळजापूर तालुक्यातील हक्काच्या रस्त्यासाठी 'बहीण-भावाचा' प्रशासकीय लढा!जिल्हा परिषद सदस्या सीमाताई माडजे आणि पंचायत समिती सदस्य कृष्णा भैय्या रोचकरी यांचे 'पीएमजीएसवाय'ला थेट निवेदन; 'तळमळीची' आणि आक्रमक मागणी!

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, प्रशासनाच्या अनास्थेविरोधात लोकप्रतिनिधींनी थेट मैदानात उतरून जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील मंगरुळ जिल्हा परिषद गटातील धडाडीच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. सिमाताई भैरवनाथ माडजे आणि आरळी (बु.) गणाचे कर्तव्यदक्ष पंचायत समिती सदस्य कृष्णा भैय्या देवानंद रोचकरी या बहीण-भावाच्या लोकप्रतिनिधी जोडीने एकत्र येत परिसरातील रस्त्यांच्या मंजुरीसाठी प्रशासकीय पातळीवर थेट धडक दिली आहे. आरळी (बु.) ते कोळेगाव आणि आरळी (बु.) ते आरळी (खु.) या अत्यंत दुरवस्था झालेल्या रस्त्यांचे काम तात्काळ मंजूर करून कामाला सुरुवात करावी, या मागणीसाठी त्यांनी 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना' (PMGSY) च्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन सादर केले.

यावेळी सिमाताई माडजे यांचे पती तथा सामाजिक कार्यकर्ते भैरवनाथ माडजे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बहीण-भावांनी लोकहितासाठी एकत्र येत प्रशासनाला धारेवर धरल्याने या अनोख्या आणि तळमळीच्या आंदोलनाची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

व्यापार ठप्प, गर्भावस्थेतील मातांचे हाल; निवेदनात मांडली 'तीव्र व्यथा'
कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात दोन्ही लोकप्रतिनिधींनी परिसरातील नागरिकांची अत्यंत बिकट परिस्थिती मांडली आहे. आरळी (बु.) हे परिसरातील एक मोठी बाजारपेठ असलेले प्रमुख गाव आहे. येथे दर शनिवारी मोठा आठवडी बाजार भरतो. गावात शासकीय दवाखाने, बँका आणि अनेक व्यापारी दुकाने असल्याने शेजारील अनेक गावांतील हजारो लोकांची येथे दररोज मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. या वाहतुकीमुळे या भागातील व्यापार आणि अर्थकारण चालते.

परंतु, गेल्या काही वर्षांपासून आरळी (बु.) ते कोळेगाव आणि आरळी (बु.) ते आरळी (खु.) हे दोन्ही रस्ते (अंदाजे ७ किमी अंतर) अत्यंत खराब झाले आहेत. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने हे रस्ते नसून मृत्यूचे सापळे बनले आहेत. यामुळे आरळी गावाची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, गावाचे अर्थकारण संपूर्णपणे ठप्प झाले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, आरळी (बु.) येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या गरोदर माता-भगिनींना या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत, अशी तीव्र व्यथा यावेळी लोकप्रतिनिधींनी मांडली.

प्रशासकीय मान्यता देऊन तात्काळ 'टेंडर' काढा!
"प्रशासनाने या जनसामान्यांच्या आणि महिलांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या प्रश्नाकडे डोळेझाक करू नये. या दोन्ही रस्त्यांचे तात्काळ 'एस्टिमेट' (अंदाजपत्रक) तयार करून, त्यांना आवश्यक ती प्रशासकीय व तांत्रिक मान्यता द्यावी. तसेच तात्काळ 'टेंडर' (निविदा) प्रक्रिया राबवून रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात यावी," अशी आक्रमक आणि भारदस्त मागणी जिल्हा परिषद सदस्या सौ. सिमाताई माडजे आणि पंचायत समिती सदस्य कृष्णा भैय्या रोचकरी यांनी केली आहे.

दरम्यान, 'पीएमजीएसवाय'च्या संबंधित अधिकाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारले असून, या रस्त्यांबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, जर प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही केली नाही, तर आगामी काळात नागरिकांच्या हितासाठी अधिक तीव्र पावले उचलली जातील, असा सूरही या निमित्ताने उमटत आहे.

Post a Comment

0 Comments