"Only न्युज धाराशिव"वृत्तसेवा
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी व कुळधर्म-कुळाचार विधीसाठी आलेल्या भाविकांचे हरवलेले १० हजार रुपये प्रामाणिकपणे परत करून तुळजापुरातील पुजारी सुशांत बाळासाहेब भोसले यांनी मानवतेचे दर्शन घडविले आहे.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मोहा येथील बाळासाहेब मारुती कांबळे हे आपल्या कुटुंबासह तुळजापुर येथे आले होते. देवीचे पुजारी सुशांत बाळासाहेब भोसले यांच्या घरी त्यांचा धार्मिक विधी पार पडला. पूजा झाल्यानंतर कांबळे कुटुंबीयांनी जेवण करून पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले.
दरम्यान, भाविकांची एक पिशवी चुकून पुजारी भोसले यांच्या घरीच राहिली होती. घर साफसफाई करताना भोसले यांच्या पत्नींना ही पिशवी आढळून आली. पिशवीत १० हजार रुपयांची रक्कम होती. त्यानंतर पुजारी भोसले यांनी तत्काळ भाविकांशी मोबाईलद्वारे संपर्क साधला व GPay द्वारे संपूर्ण रक्कम परत केली.
पुजारी सुशांत भोसले यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या या कृतीमुळे तुळजापूरच्या धार्मिक परंपरेसोबतच माणुसकीचेही दर्शन घडल्याची भावना भाविकांकडून व्यक्त होत आहे.
0 Comments