तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
सोलापूर येथील पद्मावती कन्व्हेन्शन हॉलमध्ये पार पडलेल्या रोटरीच्या भव्य डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पदग्रहण सोहळ्यात रोटरी क्लब तुळजापूरने आपल्या उत्कृष्ट कामगिरीची मोहोर उमटवली आहे. क्लबला रोटरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा 'मेंबरशिप डेव्हलपमेंट प्लॅटिनम पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. जयेश पटेल आणि डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो. नितीन कुदळे यांच्या हस्ते रोटरी क्लब तुळजापूरच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह व हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रोटरी क्लब तुळजापूरने सामाजिक उपक्रमांसोबतच संघटन बळकटीकरणावर विशेष भर दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या वर्षात क्लबने तब्बल १३ नवीन सदस्यांची यशस्वी नोंदणी करत उल्लेखनीय सदस्यवाढ नोंदवली. या दमदार कामगिरीची दखल घेत रोटरी इंटरनॅशनलतर्फे हा सर्वोच्च प्लॅटिनम पुरस्कार देऊन क्लबचा गौरव करण्यात आला.
या दिमाखदार सोहळ्याला रोटरी क्लब तुळजापूरचे अध्यक्ष रो. अमर (दाजी) हंगरगेकर, सचिव रो. संजॉय मैंदर्गी, रो. संतोष लोखंडे, माजी प्रांतपाल (PDG) रो. विष्णू मोंढे, रो. विष्णुदास अंबर, रो. किरण क्षीरसागर, रो. सुरेश कदम, असिस्टंट गव्हर्नर (AG) रो. प्रशांत अपराध, रो. ॲड. स्वाती नळेगावकर, AG रो. अतुल सोनी, रो. ॲड. अमोल गुंड, रो. गुरुराज डोंगरे, रो. पुष्कराज रोकडे यांच्यासह क्लबचे अनेक सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळजापूरच्या रोटरी क्लबला मिळालेल्या या राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मानामुळे धाराशिव जिल्ह्यातून व विविध सामाजिक स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मिळालेल्या या यशामुळे हुरूप वाढला असून, आगामी काळातही व्यापक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासोबतच संघटन वाढीवर अधिक भर दिला जाईल, असा विश्वास क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments