पुणे येथे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत धाराशिव-लातूरच्या रेल्वे प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका मांडताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि खासदार डॉ. शिवाजीराव काळगे.
'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा विशेष वृत्त
धाराशिव / पुणे:
मध्य रेल्वेच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत धाराशिव आणि लातूरसह संपूर्ण दक्षिण मराठवाड्याच्या प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी जोरदार आवाज उठवला. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत रेल्वे प्रशासनासमोर मागण्यांचा पाढा वाचत तातडीने कार्यवाही करण्याची ठाम मागणी करण्यात आली.
पुणे येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) कार्यालयात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, वरिष्ठ रेल्वे अधिकारी तसेच पुणे व सोलापूर विभागातील खासदारांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दक्षिण मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती आणि मराठवाडा जाणता विकास परिषदेच्या वतीने सचिव समीर पडवळ यांनी उपस्थित राहून प्रवाशांच्या व्यथा मांडल्या.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रमुख मागण्या:
बैठकीचे अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी धाराशिवच्या कनेक्टिव्हिटीसाठी पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडले:
नवीन प्रकल्प व विस्तार: धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला गती देणे आणि धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करणे.
नवीन गाड्या व फेऱ्या: निजामाबाद–पुणे, शेगाव/भुसावळ–पंढरपूर–कोल्हापूर, आणि नागपूर/संभाजीनगर ते गोवा या गाड्या लातूर–धाराशिव मार्गे सुरू करणे.
वंदे भारत सेवा: मुंबई–चेन्नई, हैदराबाद–मुंबई व विशाखापट्टणम–मुंबई या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा मार्ग लातूर–धाराशिव असा असावा.
स्थानक विकास व थांबे: तेर येथील संत गोरोबा काका मंदिराचे धार्मिक महत्व लक्षात घेऊन तेथे नवीन स्टेशन उभारणे, बार्शीचा 'अमृत भारत योजनेत' समावेश करणे तसेच ढोकी व कळंब रोड येथे महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देणे.
लातूर मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न:
खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी लातूरच्या शैक्षणिक व व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन मागण्या मांडल्या:
लातूर–मुंबई प्रवासातील विलंब टाळण्यासाठी आधुनिक LHB डबे जोडणे.
मुंबई/पुणे–हैदराबाद वंदे भारत सेवा धाराशिव–लातूर–उदगीर मार्गे चालवणे.
लातूर रेल्वे स्थानकावरील 'कोचिंग डेपो' व 'पिट लाईन'चे काम त्वरित पूर्ण करून कुर्डुवाडी–लातूर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण प्राधान्याने करणे.
हरंगूळ व मुरुड स्थानकांना 'Agro Products Transport Corridor' म्हणून विकसित करून कृषी मालाच्या वाहतुकीला प्रोत्साहन देणे.
रेल्वे प्रशासनाला इशारा आणि अभिनंदन:
दक्षिण मराठवाड्याचा विकास हा मुख्यत्वे रेल्वे कनेक्टिव्हिटीवर अवलंबून आहे. त्यामुळे केवळ आश्वासने न देता वेळबद्ध कार्यक्रम आखून प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी आग्रही भूमिका समितीने घेतली आहे. लोकप्रतिनिधींनी प्रवाशांचा आवाज रेल्वे प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्याबद्दल दक्षिण मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव नरहरे, कार्यवाह व सदस्यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व खासदार डॉ. काळगे यांचे आभार मानले आहेत.
आता चेंडू रेल्वे प्रशासनाच्या कोर्टात असून, मध्य रेल्वे या मागण्यांवर काय ठोस पावले उचलते याकडे संपूर्ण दक्षिण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments