'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी कृषी मंडळ व लगतच्या परिसरात गेल्या तीन-चार आठवड्यांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातील मुख्य पीक असलेले सोयाबीन संकटात सापडले आहे. पावसाच्या मोठ्या खंडामुळे ऐन फुलोऱ्यात आणि शेंगा धरण्याच्या संवेदनक्षम टप्प्यावरच पीक कोमेजून जाऊ लागल्याने परिसरातील शेतकरी वर्ग कमालीचा चिंतातुर झाला आहे.
भांडवली खर्च वाया जाण्याची भीती
हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी महागडे बियाणे, खतांची मात्रा, कोळपणी, निंदणी आणि महागड्या कीटकनाशकांची फवारणी असा प्रतिएकरी मोठा खर्च केला होता. पिकाची सुरुवातीची वाढ अत्यंत जोमदार झाली होती; मात्र आता ऐन गरजेच्या वेळी पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा संपला आहे. तीव्र उन्हामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडून कोमेजत आहेत, ज्यामुळे उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
केवळ पिकेच नव्हे, तर विहिरी व बोअरवेलच्या कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळ्यांमध्येही झपाट्याने घट झाली आहे. पावसाचा हा खंड असाच कायम राहिल्यास पिकांच्या नुकसानीसोबतच आगामी काळात चारा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
शासकीय पंचनामे व पीकविमा भरपाईची मागणी
या संकटाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने आणि महसूल प्रशासनाने काटी परिसरातील बाधित क्षेत्राची तातडीने पाहणी करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे सुरू करावेत. तसेच, हवामान घटकांवर आधारित पीकविमा योजनेचा लाभ आणि आपत्कालीन अर्थसाहाय्य देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आक्रमक मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
0 Comments