काटी | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
दि. १३ : तुळजापूर–शेळगाव (आर) एसटी बसफेरी सावंतवाडी क्र. २ ते वाणेवाडीमार्गे पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीला आता ओढ्यावरील पुलाची अडचण आडवी आली आहे. धाराशिव आगाराने गुरुवारी (दि. १३) प्रत्यक्ष एसटी बस नेऊन मार्गाची पाहणी केली असता वाणेवाडी व सावंतवाडी क्र. २ दरम्यान ओढ्यावर पूल अथवा सिमेंट मोरी नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, पूल झाल्याशिवाय या मार्गावर बससेवा सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तुळजापूर–शेळगाव (आर) बसफेरी सावंतवाडी क्र. २ व वाणेवाडीमार्गे वळसा देऊन पूर्ववत सुरू करण्यासाठी शेळगाव (आर) येथील दयानंद भगवान बादगुडे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत धाराशिव आगाराचे वाहतूक निरीक्षक धन्यकुमार कानडे, चालक व्ही. एन. वाघे आणि चालक पी. बी. मोरे यांनी एसटी बससह मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान वाणेवाडी व सावंतवाडी क्र. २च्या दरम्यान पाटबंधारे विभागाच्या साठवण तलावाच्या कालव्यावर/ओढ्यावर पूल, पक्का बंधारा किंवा सिमेंट मोरी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. ओढ्यातून एसटी बस नेणे धोकादायक असल्याने आवश्यक बांधकाम झाल्याशिवाय बसफेरी सुरू करता येणार नसल्याचे वाहतूक निरीक्षक कानडे यांनी सांगितले.
संबंधित विभागांच्या पाहणीअभावी नाराजी
दरम्यान, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व पाटबंधारे विभागाला या प्रश्नाची माहिती देण्यात आली असतानाही १३ ऑगस्टपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली नसल्याचा आरोप बादगुडे यांनी केला आहे. पुढील कार्यवाहीबाबत कोणताही स्पष्ट अहवाल किंवा आश्वासन मिळाले नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय
“सावंतवाडी क्र. १ व २ आणि वाणेवाडी येथील विद्यार्थी व प्रवाशांचे एसटीअभावी मोठे हाल होत आहेत. धाराशिव आगाराच्या अधिकाऱ्यांनी बस आणून प्रामाणिकपणे पाहणी केली, त्याबद्दल त्यांचे आभार. मात्र महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाच्या असहकार्यामुळे मी १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसण्यावर ठाम आहे,” असे दयानंद बादगुडे यांनी सांगितले.
पूल बांधकामाचा प्रश्न मार्गी लागून एसटी सेवा पूर्ववत कधी सुरू होणार, याकडे वाणेवाडी, सावंतवाडी परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थी-प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
0 Comments