'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
धाराशिव / लातूर
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातून कोकणात जाणाऱ्या भाविक आणि प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, नांदेड येथून लातूर व धाराशिवमार्गे कोकणासाठी (चीपळूण / रत्नागिरी / सावंतवाडी) विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात, अशी जोरदार मागणी लातूर लोकसभेचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे आणि धाराशिव लोकसभेचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांनी केली आहे. यासंदर्भात दोन्ही खासदारांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या (सिकंदराबाद) महाव्यवस्थापकांना स्वतंत्र पत्र लिहून तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मराठवाड्यातून, विशेषतः नांदेड, लातूर, धाराशिव आणि लगतच्या भागांतून कोकणातील आपल्या मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. मात्र, थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेक गाड्या बदलाव्या लागतात अथवा खासगी वाहतुकीचा महागडा पर्याय स्वीकारावा लागतो. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होतात.
१० ते २० सप्टेंबरदरम्यान विशेष रेल्वे चालवण्याची विनंती
खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या निवेदनात १०, ११, १२, १३, १८, १९ आणि २० सप्टेंबर २०२६ या महत्त्वाच्या तारखांना नांदेड ते कोकण दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची मागणी केली आहे. तसेच या गाड्यांच्या परतीच्या फेऱ्याही त्याच प्रमाणात आयोजित कराव्यात, असे पत्रात नमूद केले आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुचवले संभाव्य मार्ग:
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रेल्वे प्रशासनाला ऑपरेशनल सुलभतेसाठी दोन पर्यायी मार्ग सुचवले आहेत:
पर्याय १: नांदेड – पूर्ण – परभणी – लातूर रोड – कुर्डूवाडी – पुणे – पनवेल – चिपळूण / रत्नागिरी / सावंतवाडी रोड.
पर्याय २: नांदेड – परभणी – जालना – छत्रपती संभाजीनगर – मनमाड – कल्याण – पनवेल – चिपळूण / रत्नागिरी / सावंतवाडी रोड.
प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता
मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे यांच्याशी समन्वय साधून रेल्वे रुळांची उपलब्धता (Train Paths) व रॅक (Rake) नियोजन करून ही सेवा प्राधान्याने सुरू करावी, अशी विनंती दोन्ही लोकप्रतिनिधींनी केली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने रेल्वे प्रशासनाने यावर तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, जेणेकरून हजारो कोकणवासी प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments