मुरूम, ता. उमरगा, ता. ७ (प्रतिनिधी): येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मध्ये मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिन मंगळवारी (ता. ६) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सच्चिदानंद अंबर होते. प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी दै. सकाळ अचलेरचे पत्रकार जगदीश सुरवसे यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात जगदीश सुरवसे हे समाजहित डोळ्यासमोर ठेवून वस्तुनिष्ठ वृत्तांकन करत पत्रकारितेची विश्वासार्हता जपली आहे. त्यांच्या या निष्ठावंत व उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. यावेळी सच्चिदानंद अंबर यांनी आपल्या मनोगतातून पत्रकारितेचे सामाजिक महत्त्व, सत्यता व मूल्याधिष्ठित लेखन यावर प्रकाश टाकला. शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, पत्रकार हा समाजाचा आरसा असून त्यांच्या लेखणीतून सामाजिक परिवर्तन घडते.
सत्काराला उत्तर देताना सुरवसे यांनी पत्रकारितेतील अनुभव कथन करून बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक पंकज पाताळे यांनी केले. सुत्रसंचलन व आभार शिक्षिका साक्षी देशमाने यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये जगदीश सुरवसे यांचा सत्कार करताना सच्चिदानंद अंबर, अनुराधा जोशी व शिक्षकवृंद.
0 Comments