तुळजापूर/उमाजी गायकवाड
नगरपालिका, महापालिका निवडणुकानंतर राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली.त्यानुसार, राज्यातील 12 जिल्ह्यात निवडणुकांचा धुरळा उडणार असून 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांच्याकडून जाहीर करण्यात आला. आयोगाने निवडणुकीने घोषणा करताच 12 जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू झाली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच धाराशिव जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या व ग्रामीण भागातील सत्तासमीकरणे ठरविणाऱ्या या निवडणुका अंत्यंत महत्वपूर्ण समजल्या जातात. त्यामुळे जिल्ह्यातील महायुती व महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. काटी जिल्हा परिषद गट व पंचायत समितीची गणाची निवडणूक रंगतदार होणार असून या निवडणुकीत काटी जिल्हा परिषद गटातून व पंचायत समिती गणातून अनेकजण इच्छुक असून कोणात्या इच्छुकांच्या स्वप्नांचा चुराडा होणार की लॉटरी लागणार याचा फैसला लवकरच होणार आहे.
या निवडणुकीत धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी तसेच जिल्ह्यातील धाराशिव,तुळजापूर,भूम, परंडा, वाशी, कळंब, लोहारा, उमरगा या आठ पंचायत समितींच्या 110 गणांसाठी मतदान होणार आहे. एकूण 11 लाख 45 हजार 888 मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यामुळे ही निवडणूक जिल्ह्याचे राजकीय भविष्य ठरवणारी असणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 16 ते 21 जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज भरणे, 22 जानेवारी रोजी अर्जांची छाननी, 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी माघार घेण्याची तारीख,व त्याचदिवशी दुपारी 3:30 वाजता चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान होऊन 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली असून प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी तयारी सुरू आहे. पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्रांची सज्जता, तसेच संवेदनशील गावांवर विशेष लक्ष दिले जात आहे.
दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निवड, आघाड्या, मित्रपक्ष, तसेच बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.अनेक मतदारसंघांत थेट लढती होण्याची शक्यता असून काही ठिकाणी अपक्ष उमेदवारही निकालावर प्रभाव टाकू शकतात. स्थानिक प्रश्न, विकासकामे, पाणीटंचाई,रस्ते,आरोग्य व शिक्षण हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे ठरणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक न राहता, आगामी राजकीय समीकरणे ठरविणारी प्रतिष्ठेची लढत ठरणार असल्याचे चित्र आहे.
उमेदवार स्थानिक असावा,सर्व जिल्हा परिषद गटातून जोरदार मागणी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदार संघांमध्ये उमेदवार हा त्या-त्या मतदारसंघातीलच स्थानिक रहिवासी असावा, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. बाहेरून लादलेले उमेदवार नकोत, तर गावाच्या प्रश्नांची जाण असणारा, जनतेत वावरणारा आणि सतत उपलब्ध असणारा प्रतिनिधी द्यावा, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करीत आहेत.
स्थानिक प्रश्न, विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण याबाबत थेट अनुभव असलेला उमेदवारच प्रभावीपणे काम करू शकतो,अशी भूमिका ग्रामस्थांकडून मांडली जात आहे.त्यामुळे उमेदवार निवडताना राजकीय पक्षांनी स्थानिक नेतृत्वालाच संधी द्यावी, अन्यथा नाराजीचा फटका बसू शकतो,असा इशाराही मतदारांकडून दिला जात आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments