मुरुम/प्रतिनिधी
कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाची शिकण्याची पद्धत बदलत असून वैयक्तिक गरजांनुसार उपयोग करणे शक्य करते आहे. यामुळे शिक्षण अधिक सुलभ, वेगवान आणि सर्वसमावेशक बनत असले तरी मानवाचा बौद्धिक विकास, विचारशक्तीचा समतोल राखण्यासंबद्धी आव्हाने उभी करत आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा वापर नैतिकता, गोपनीयता आणि मानवी मूल्ये जपत केला तरच त्याचे फायदे समाजाला दीर्घकाळ लाभदायक ठरतील असे मत मा. अमोलराव मोरे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शुक्रवार २ जानेवारी रोजी आयोजित शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे यांच्या स्मरणार्थ आयोजित शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. या प्रसंगी मा. भानुदासराव माने, मा. रामराव इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
निजामी राजवटीमध्ये मराठवाड्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे यांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा मिळावा आणि विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व आणि नेतृत्व गुण विकसित व्हावेत यासाठी विविध सामाजिक विषयावर विचारमंथन घडवून आणण्याच्या हेतूने या आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले जाते.
यावर्षीच्या एकेचाळिसाव्या वर्षातील स्पर्धेसाठी "कृत्रिम बुद्धिमत्ता युवा पिढीच्या बौद्धिक विकासासाठी तारक आहे/नाही" या ज्वलंत विषयावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या चार जिल्ह्यातील पंधरा संघांनी आपला सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत लातूर येथील दयानंद विधी महाविद्यालयाच्या पात्रुडकर कस्तुरी व आदिती ढगे यांच्या संघाने प्रथम पारितोषिक रुपये दहा हजार एक, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र तर छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय बलसुर येथील प्रगती औसेकर आणि भालेराव राणी यांच्या संघाने सांघिक द्वितीय पारितोषिक रुपये सात हजार एक व प्रमाणपत्र पटकाविले. श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय उमरगा येथील श्रद्धा खटके यांना वैयक्तिक तीन हजार रुपयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
भारत शिक्षण संस्थेचे सहचिटणीस मा. डॉ. सुभाष वाघमोडे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. बक्षीस वितरणाचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञांनामुळे नोकर्या कमी होण्याची भीती नसून नोकर्या निर्माण कशा होतील याकडे विद्यार्थ्यानी लक्ष द्यावे असे प्रतिपादन केले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. सुधीर मठपती, डॉ. राम कदम, प्रा. परमेश्वर सूर्यवंशी आणि श्री राजेश्वर वाघमारे यांनी काम पाहिले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ. पद्माकर पिटले, प्रभारी प्राध्यापक डॉ. अशोक पदमपल्ले, उपप्राचार्य जी. एस. मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, संयोजन समितीचे प्रमुख डॉ. विनोद देवरकर, डॉ. चंद्रसेन करे, डॉ. सन्मुख मुच्छटे, डॉ. व्ही. एम. गायकवाड, प्रा. अनंत कसगीकर, डॉ. व्ही. एम. गायकवाड, प्रा.महेश माकणिकर, प्रा. एम. डी. साळुंके, डॉ. प्रवीण जवळगेकर, प्रा. बी. व्ही. मोरे, प्रा. सूरज सूर्यवंशी आणि प्रा. एस. बी. कल्हाळीकर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप पाटील यांनी तर डॉ. विनोद देवरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments