काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कन्या आणि सध्या पुण्याच्या कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या कु. वरदायनी पृथ्वीराज देशमुख हिने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जागतिक स्तरावरील 'ऑलिअन्झ टेक्नॉलॉजी टेक चॅम्पियनशिप 2025' (Allianz Technology Tech Championship 2025) मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल तिला 3000 युरो (सुमारे 3 लाख 22 हजार रुपये) आणि मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
वरदायनी ही तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी असून, ती बॅरिस्टर स्व. धैर्यशीलराव शहाजीराजे देशमुख यांची नात आणि ॲड. पृथ्वीराज धैर्यशीलराव देशमुख यांची कन्या आहे.
महिला सुरक्षिततेसाठी बनवले सॉफ्टवेअर
पुण्यातील कमिन्स कॉलेजमध्ये बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स) च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या वरदायनीने 'ऑलिअन्झ टेक्नॉलॉजी'तर्फे आयोजित अखिल भारतीय स्तरावरील 'ग्लोबल टेकफेस्ट चॅम्पियनशिप'मध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तिने 'वूमेन्स सेफ्टी' (Women's Safety) या विषयावर नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर डिझाइन सादर केले. देशातील हजारो विद्यार्थ्यांमधून तिच्या या प्रकल्पाची निवड करण्यात आली असून, टॉप 50 गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये तिने आपले स्थान निश्चित केले.
पुण्यात झाला गौरव
नुकताच पुणे येथे एका विशेष सोहळ्यात वरदायनीला हा पुरस्कार आणि 3000 युरोची स्कॉलरशिप सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. तिच्या या यशामुळे काटी गावासह तुळजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातून येऊन तंत्रज्ञान क्षेत्रात मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात तिने मिळवलेली ही 'टेक चॅम्पियनशिप' स्कॉलरशिप तिच्या उज्ज्वल भविष्याची नांदी
ॲड.पृथ्वीराज देशमुख
"स्व. बॅरिस्टर धैर्यशीलराव देशमुख यांचा वारसा वरदायनीने समर्थपणे पुढे नेला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात तिने मिळवलेली ही 'टेक चॅम्पियनशिप' स्कॉलरशिप तिच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. लेकीच्या या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे!"
— ॲड.पृथ्वीराज धैर्यशीलराव देशमुख (काटीकर)
आमच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा – 'Only न्युज धाराशिव'
0 Comments