मंगरुळ/चॉंदसाहेब शेख
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, अन्नदान अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 75 बहाद्दर रक्तदात्यांनी रक्तदान करून आदर्शवत शिवजयंती साजरी केली. या रक्तदान शिबिरासाठी येथील शिवप्रेमी युवकांनी विशेष परिश्रम घेतले. सोलापूर ब्लड सेंटरच्या ब्लड बँकेमार्फत रक्तसंकलन करण्यात आले. भविष्यात मंगरुळ येथील कोणत्याही गरजवंतास तात्काळ रक्तपुरवठा करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
शिवजयंतीच्या निमित्ताने सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेशही देण्यात आला. मंगरुळ येथील मुस्लिम युवकांनी मसाला दुधाचे वाटप करून सर्वधर्मसमभावाचा आदर्श घालून दिला. “धर्म जरी वेगळे असले तरी आपली माती, आपला इतिहास आणि आपला अभिमान एकच आहे,” असा संदेश देत हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
"शिवरायांनी स्वराज्य स्थापन करताना सर्वधर्म व सर्व जातींचा सन्मान राखत न्याय, शौर्य, स्वाभिमान आणि लोककल्याण यांचा आदर्श निर्माण केला. त्याच विचारांचा वारसा जपत मंगरुळ येथील मुस्लिम युवक गेल्या अनेक वर्षांपासून शिवजयंतीनिमित्त मसाला दूध वाटपाचा उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या सामाजिक एकोप्याच्या कार्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे."
आमच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा – 'Only न्युज धाराशिव'
0 Comments