Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सातासमुद्रापार शिवगर्जना! पॅरिसच्या भूमीत घुमला शिवरायांचा जयजयकार; 55 कृषी अभ्यासकांनी साजरा केला शिवजन्मोत्सव

धाराशिव | प्रतिनिधी
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केवळ भारतातच नव्हे, तर सातासमुद्रापार युरोपच्या भूमीतही अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस शहरात महाराष्ट्रातील 55 कृषी अभ्यासकांनी एकत्र येत शिवरायांना मानाचा मुजरा केला, ज्यामुळे अवघा पॅरिस परिसर ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

तिरंगा आणि भगव्याने उजळली पॅरिसची नगरी
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत युरोपमधील आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रातून 55 प्रतिनिधींचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये दैनिक ‘पुण्यनगरी’चे वृत्त संपादक धनंजय (भैय्या) रणदिवे यांच्यासह राज्यातील निवडक कृषी तज्ज्ञांचा समावेश आहे. 19 फेब्रुवारी रोजी हा गट पॅरिसमध्ये असताना, त्यांनी आपल्या लाडक्या राजाचा जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.

हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि भगवा ध्वज, सोबत छत्रपती शिवरायांची प्रतिमा अशा पारंपरिक आणि अभिमानास्पद वातावरणात हा सोहळा पार पडला.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासासोबतच संस्कृतीची जपणूक
हा अभ्यास दौरा 16 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून तो 27 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या काळात हे अभ्यासक फ्रान्समधील द्राक्ष बागायत आणि प्रक्रिया उद्योग,जर्मनीमधील आधुनिक कृषी अवजारे आणि यंत्रसामुग्री, स्वित्झर्लंडमधील दुग्धव्यवसाय आणि पशुपालन तंत्रज्ञान तर नेदरलँड्समध्ये ग्रीन हाऊस आणि फुलशेतीमधील जागतिक तंत्रज्ञान आदी शेती प्रक्रिये संदर्भात अभ्यासाकडून माहीती घेतली जाणार आहे.

सातासमुद्रापार घुमला महाराष्ट्राचा स्वाभिमान
विदेशी भूमीवर आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत असतानाच, आपल्या राजाचा विसर पडू न देता या टीमने केलेला जयघोष हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण ठरला. "जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी आमचा राजा आमच्या काळजात आहे," हीच भावना या निमित्ताने व्यक्त झाली.

या ऐतिहासिक सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्रातून या कृषी अभ्यासकांचे कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments