ढोकी/सुरेश कदम
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळा समिती आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने सलग तीन दिवस विविध प्रबोधनात्मक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रबोधन आणि कलेची मेजवानी
उत्सवाची सुरुवात मंगळवार, दि. 17 रोजी प्रा. वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाने झाली. 'न कळालेले आई-बाप' या विषयावर त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर बुधवारी रात्री बिहारीलाल राजपूत यांच्या खणखणीत आवाजातील पोवाड्याने शिवरायांचा इतिहास जिवंत झाला.
भक्तीमय वातावरणात शिवजन्मोत्सव
मध्यरात्री ठीक 12 वाजता महाराजांचा पाळणा सोहळा संपन्न झाला. विशेष आकर्षण म्हणजे मासाहेब जिजाऊंच्या वेशभूषेत रेखाताई कदम यांनी उपस्थिती लावली होती. शालिनीताई देशमुख, मयुरी धाकपाडे, दिपाली धाकपाडे, सुवर्णा धाकपाडे आणि चिमुकली आधीरा धाकपाडे यांनी अत्यंत सुश्राव्य आवाजात पाळणा गायला. फुलांची सजावट आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि मिठाई वाटपाने शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
सामाजिक बांधिलकी: 32 शिवभक्तांचे रक्तदान
केवळ उत्सवच नव्हे, तर सामाजिक भान जपत समितीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये 32 शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रेणुका ब्लड बँकेने या रक्ताचे संकलन केले.
प्रतिमा पूजन व अभिवादन
गुरुवार, दि. 19 रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, ग्रामपंचायत कार्यालय, तुळजाभवानी नगर आणि गावातील विविध शाळांमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सर्व जाती-धर्माचे शिवभक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments