तुळजापूर | विशेष प्रतिनिधी
येथील छत्रपती शिवाजी नगर (हेलिपॅड परिसर) येथे शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, कोणत्याही मोठ्यांच्या मदतीशिवाय केवळ लहान मुलांनी एकत्र येऊन, स्वतःच्या कष्टाने आणि नियोजनाने हा उत्सव साजरा करत साऱ्यांची मने जिंकली आहेत.
महिन्याभराची मेहनत आणि सायकल रॅली
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी गेल्या महिनाभरापासून या उत्सवाची तयारी सुरू केली होती. कॉलनी आणि हेलिपॅड परिसरातून स्वतः वर्गणी जमा करून मुलांनी उत्सवाचा निधी उभा केला. स्वतःच्या परिश्रमातून बांबू, वेळू आणि कापडाच्या साह्याने भव्य मंडप उभारला.
उत्सवाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि 'जय भवानी, जय शिवाजी' च्या जयघोषात मुलांनी सायकलींना भगवे झेंडे लावून परिसरातून सायकल रॅली काढली.
बाल मंडळाचे शिस्तबद्ध नियोजन
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी 'शिवबाल मंडळा'च्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने या बाल गोपाळ शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष सार्थक ताकमोघे,उपाध्यक्ष कौस्तुभ भारती सचिव सर्वेश ताकमोघे,कोषाध्यक्ष शिरीष पुरी,सहसचिव जय साळुंके यांचा सहभाग होता.
यावेळी वीरू साळुंके,पृथ्वीराज कोळी,अथर्व साळुंके, शंभू काळे, अर्जुन लबडे यांच्यासह मंडळाचे सर्व बाल सदस्य उपस्थित होते. चिमुकल्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे.
0 Comments