काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील नांदुरी केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चव्हाणवाडी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा दिला.
उपक्रमांची रेलचेल:
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन आणि आरतीने झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिवरायांचा जीवनपट उलगडला. विशेष म्हणजे, जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित प्रश्नमंजुषा, चित्रकला, वक्तृत्व आणि पोवाडा गायन स्पर्धांमधील यशस्वी गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
पोवाड्याने जिंकली मने:
इयत्ता आठवीची विद्यार्थिनी संजना चव्हाण हिने सादर केलेल्या 'प्रतापगडचा रणसंग्राम' या पोवाड्याने उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. मुख्याध्यापक श्री. नितीन गायकवाड व सहशिक्षक श्री. शांताराम कुंभार यांनी आपल्या व्याख्यानातून शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य आणि पराक्रमाची महती विशद केली.
मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रतिनिधी श्री. रामभाऊ सुरडे, उपाध्यक्ष श्री. नानाश्री नवगिरे, सदस्य हनुमंत चव्हाण, प्रदीप चव्हाण, रामकृष्ण चव्हाण, खंडू शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संजना आणि शुभेच्छा चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. हनुमंत डोलारे, विकास ढंगे, सुवर्णा काळे आणि दिपाली व्होटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता गोड खाऊ वाटपाने करण्यात आली.
0 Comments