"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
"हे सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु म्हणणाऱ्या व अंमलबजावणी न करता नुसती कर्ज माफीची घोषणा करणाऱ्या सरकारला धारेवर धरताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सरकारची कर्ज माफीची घोषणा म्हणजे लबाडा घरचे जेवण असल्याचा उपरोधिक टोला लगावत हे सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी अदानींच्या घशात घालण्याचे पाप करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले- आंबेडकरांचा विचार पुसून टाकू पाहणाऱ्या हुकूमशाही भाजप सरकारला आता 'चले जाव' म्हणण्याची वेळ आली आहे," असा घणाघाती प्रहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
सुरतगाव येथून निघालेल्या भव्य 'शेतकरी संघर्ष न्याय यात्रे'चा समारोप सोमवार दि. ३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालय येथे एका विराट जाहीर सभेने झाला. यावेळी केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवताना ते बोलत होते. पुढे बोलताना सपकाळ म्हणाले की, अमेरिकेसाठी निर्यात शुल्क माफ करून सरकारने सपशेल सरेंडर केले आहे. देशाचा स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे.
भाजपला महापुरुषांची नावे पुसायची आहेत
सभेला संबोधित करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे म्हटले, "भाजपला केवळ काँग्रेसच नाही, तर अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी, विलासराव देशमुख, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंचे नावही पुसून टाकायचे आहे. १५ लाख रुपये आणि नोकऱ्यांच्या खोट्या घोषणा देऊन जनतेला फसवले गेले. शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारून सर्व योजना गुजरातला पळवल्या जात आहेत. 'घालीन लोटांगण वंदीन चरण' म्हटल्याप्रमाणे पंतप्रधान वागत असून त्यांनी देशाचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे." संतोष देशमुख हत्याकांड आणि भोंदू बाबा खरात प्रकरणावरही त्यांनी सरकारवर तीव्र ताशेरे ओढले.
पाटील पिता-पुत्रांनी जिल्ह्याला भकास केले
जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज (भैय्या) पाटील यांनी स्थानिक प्रश्नांवरून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "स्वतःला पीक विमा स्पेशालिस्ट म्हणवून घेणाऱ्यांना अद्याप २०२० चा विमा मिळवून देता आला नाही. २१ टीएमसी पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. ४० वर्षे सत्ता हाती असतानाही पाटील पिता-पुत्रांनी धाराशिव जिल्ह्याला भकास केले. रोजगार हमी सारख्या काँग्रेसच्या योजना बंद करून हे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे."
चुकीच्या हातात सत्ता बदल
काँग्रेस प्रवक्ते हणमंतराव पवार यांनी तुळजापूरच्या राजकीय वारशाची आठवण करून दिली. "ज्या तालुक्याचे नेतृत्व माणिकराव खपले, मधुकरराव चव्हाण, नरेंद्र बोरगांवकर आणि आलुरे गुरुजीं, साहेबराव हंगरगेकरसारख्या दिग्गजांनी केले, तिथे तुळजाभवानी सारख्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज चुकीच्या व्यक्तीच्या हाती सत्ता गेल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. गॅस आणि पेट्रोलच्या रांगेत माता-भगिनींना उभे करून लाडक्या बहिणींना स्वतःच्या खिशातील पैसे दिल्यासारखा आव 'भामटे सरकार' आणत आहेत. गद्दारांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे," असेही ते म्हणाले.
शेतकरी संघर्ष न्याय यात्रेच्या सभेत प्रमुख मुद्द्यावर भर देण्यात आला यामध्ये प्रामुख्याने भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांपासून सावध राहण्याचे आवाहन,
सर्व जमिनी 'वर्ग १' मध्ये करण्याची मागणी,सक्तीने बसवले जाणारे स्मार्ट मीटर आणि अनियमित वीज पुरवठ्याचा निषेध,संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन या विषयावर भर देण्यात आला.
या सभेला जिल्हाभरातील शेतकरी, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. "या सरकारला खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही," असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Only न्युज धाराशिव – ताज्या बातम्या आणि सविस्तर विश्लेषणासाठी पाहत राहा!
0 Comments