"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
मंगरुळ | चॉंदसाहेब शेख
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील अंगणवाडी शिक्षिका रुकूमबी इमाम शेख यांची मुलगी तसेच धाराशिव तालुक्यातील अंबेजवळगा येथील तरुण शेतकरी अरबाज पठाण यांची पत्नी मेहर पठाण (शेख) हिची पोलिस दलात कॉन्स्टेबलपदी निवड झाली आहे. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे.
मेहर पठाण यांचा जन्म मंगरुळ येथे झाला असून त्यांचे माहेरचे नाव मेहर इमामपाशा शेख असे आहे. दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांचा विवाह अंबेजवळगा येथील अरबाज पठाण यांच्याशी झाला. त्यांचे पती शेती व्यवसाय करतात. त्यांना आरहान नावाचा दोन वर्षांचा मुलगा आहे.
मेहर यांनी प्राथमिक शिक्षण मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षण धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये घेतले. पुढे त्यांनी १० ऑगस्ट २०२५ पासून धाराशिव येथील सह्याद्री करिअर अकॅडमीमध्ये पोलिस भरतीचे प्रशिक्षण सुरू केले.
सातत्यपूर्ण अभ्यास, नियमित सराव आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी अवघ्या २२ व्या वर्षी हे यश मिळवले. त्यांच्या आई रुकूमबी, वडील इमामपाशा तसेच विवाहानंतर पती अरबाज पठाण, सासू सबीयाबी आणि सासरे हुसेन अजहर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले.
मेहर पठाण यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक तसेच माहेर व सासरकडील ग्रामस्थांकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
"सातत्यपूर्ण अभ्यास, नियमित व्यायाम, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाने यश नक्की मिळते
“सातत्यपूर्ण अभ्यास, नियमित व्यायाम, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम केल्यास नक्की यश मिळते. माझ्या या यशाचे संपूर्ण श्रेय माझ्या माहेर व सासरच्या कुटुंबीयांना जाते.”
– मेहर पठाण (शेख)
0 Comments