धाराशिव: "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, युवा सेना लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांनी आपल्या पदाचा आणि जिल्हा परिषद सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सभापती निवडीत आपल्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचा खळबळजनक आरोप करीत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीच्या प्रक्रियेत आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील यांचे नाव दुपारी १२:४० वाजेपर्यंत चर्चेत होते. मात्र, ऐनवेळी त्यांना डावलून दुसऱ्या उमेदवाराला सभापतीपद देण्यात आले. या प्रकारामुळे आनंद पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
'हेतुपुरस्सर डावलले'; पाटील यांचा गंभीर आरोप
आपल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना आनंद पाटील म्हणाले की, "मी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या रिंगणात उतरलो होतो. माझ्या मातोश्रींचे नाव निश्चित असतानाही त्यांना हेतुपुरस्सर सभापतीपदापासून दूर ठेवण्यात आले. हा केवळ त्यांच्यावरच नाही, तर आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेवरही अन्याय आहे."
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
आनंद पाटील यांनी एकाच वेळी युवा सेना लोकसभा अध्यक्षपद आणि जिल्हा परिषद सदस्यत्व सोडल्यामुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा राजीनामा आगामी काळातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
ब्युरो रिपोर्ट, Only न्युज धाराशिव
0 Comments