"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे देशसेवा, शिक्षण आणि आरोग्य अशा तीनही क्षेत्रांत यश मिळवणाऱ्या सुपुत्रांचा ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. वार्षिक दिंडी सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात सेवानिवृत्त सुभेदार, नवनियुक्त डॉक्टर कन्या आणि शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांच्या गौरवार्थाने संपूर्ण गाव उत्सवात न्हाऊन निघाले होते.
सुभेदार डोंगरे यांचे टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत
भारतीय सैन्य दलात सलग ३० वर्षे २५ दिवस निष्ठेने सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले सुभेदार श्री. शाम रघुनाथ डोंगरे यांचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. संपूर्ण गावातून सुभेदारांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी टाळ-मृदंगाचा गजर आणि 'भारत माता की जय'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. देशसेवेचे कर्तव्य पार पाडून परतलेल्या या सुपुत्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावची लेक झाली 'डॉक्टर'
याच सोहळ्यात गावातील कु. समृद्धी बालाजी डोंगरे हिने वैद्यकीय क्षेत्रातील मानाची 'बी.एच.एम.एस.' (BHMS) पदवी संपादन केल्याबद्दल तिचाही विशेष नागरी सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातून जिद्दीच्या जोरावर डॉक्टर होण्याचा मान मिळवल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जि. प. शाळेच्या गुणवंतांचा डंका
पांगरदरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी 'एन.एम.एम.एस.' (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यामध्ये वैधवी महादेव गायकवाड,प्राणिती राम मते, संचिता सचिन मते,सरस्वती दादाराव साळुंके,वैभवी सतीश कदम,राजनंदिनी दादाराव मोरे, कल्याणी मल्हारी क्षीरसागर, सोहम सहदेव कदम
या आठही विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांनी जाहीर गौरव केला.
कीर्तन सेवेने सांगता
या आनंदोत्सवाची सांगता ह.भ.प. कान्होबा महाराज देहूकर यांच्या रसाळ कीर्तनाने झाली. "गावातील तरुण पिढीने सैनिक, डॉक्टर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा," असा संदेश यावेळी देण्यात आला. एकाच व्यासपीठावर देशाचे रक्षक, समाजाचे रक्षक (डॉक्टर) आणि उद्याचे भविष्य (विद्यार्थी) यांचा सन्मान झाल्याने पांगरदरवाडीत प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments