Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्र्यांची 'गर्जना'! "मी कॉमन मॅन अन् हे सरकार सर्वसामान्यांचे"; नाट्यगृहासाठी ५ कोटींचा निधी जाहीर करत 'विरोधकांच्या पोटदुखीवर माझ्याकडे जालीम उपाय!' धाराशिवच्या व्यासपीठावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट प्रहार; धाराशिवमध्ये शिंदेंची फटकेबाजी! शेतकरी, विकास आणि विरोधक... प्रत्येक मुद्द्यावर उपमुख्यमंत्र्यांनी मारले 'सिक्सर'

 "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
धाराशिव | उमाजी गायकवाड 
"मी जे काही करतो ते उघडपणे करतो, लपून-छपून काहीही करण्याची माझी पद्धत नाही. आमचे सरकार हे सामान्यांचे सरकार असून, मुख्यमंत्री म्हणजे 'कॉमन मॅन' आहे," अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांनी धाराशिवकरांची मने जिंकली. निमित्त होते धाराशिव येथे संपन्न झालेल्या दैनिक 'पुण्य नगरी' आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे. यावेळी त्यांनी शेतकरी कल्याण, मराठवाड्याचा पाणीप्रश्न आणि विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी व्यासपीठावर आमदार ज्ञानराज चौगुले,माजी खासदार रविंद्र गायकवाड, जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,नगराध्यक्ष नेहा काकडे, दैनिक पुण्यनगरीचे वृत्त संपादक धनंजय रणदिवे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव संतोष जाधव, सहसचिव राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबिरे, चंद्रशेन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. तसेच दैनिक ‘पुण्य नगरी’चे संस्थापक संपादक कै.मुरलीधरआप्पा शिंगोटे, कै.अनंत भालेराव यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. 

बाळासाहेबांच्या विचारांचीच ही खरी शिवसेना!
उपस्थितांना पुढे संबोधित करताना ना. शिंदे म्हणाले की, "ही शिवसेना वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. संकटकाळात जनतेच्या पाठीशी उभी राहणारी ही संघटना असून, आम्ही सत्तेसाठी नव्हे तर जनसेवेसाठी मैदानात आहोत."

शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय: मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा संपवणार!
शेतकरी कल्याणावर बोलताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या यामध्ये प्रामुख्याने १००% पीक विमा सवलत: पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या हप्त्यात १००% सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे.

मराठवाड्यासाठी ३२ हजार कोटी: मराठवाड्याचा दसरा-दिवाळी गोड व्हावा, यासाठी ३२,००० कोटींच्या मदतीची तरतूद केली आहे.

दुष्काळमुक्त धाराशिव: 'दुष्काळी गाव' हा शब्दच राज्याच्या शब्दकोशातून पुसून टाकण्याचा आमचा निर्धार असून मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून दुष्काळ कायमचा संपवू.

विरोधकांच्या 'पोटदुखी'वर औषध माझ्याकडे!
विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ते मिश्किलपणे म्हणाले, "मी जे काही करतो त्यावर विरोधकांना पोटदुखी सुटते. मी गावात गेलो तरी त्यांना पोटदुखी होते आणि दिल्लीत गेलो तरी! पण त्यांच्या या पोटदुखीवर माझ्याकडे जालीम उपाय आहे." यावेळी त्यांनी गेल्या अडीच वर्षांत घेतलेल्या ५६७ महत्त्वाच्या निर्णयांचा पाढाच वाचला.

'ऑन द स्पॉट' ५ कोटींचा निधी जाहीर
कार्यक्रमात करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या मागणीचा विचार करून उपमुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ ५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद जाहीर केली. "मी जे बोलतो ते करून दाखवतो, कारणे सांगत बसत नाही," अशा शब्दात त्यांनी आपला बाणा स्पष्ट केला. तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी १८६५ कोटींच्या आराखड्याला मान्यता दिल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

गुणवंतांचा आणि पत्रकारांचा गौरव
या सोहळ्यात सहकार क्षेत्रातील हभप वसंतराव नागदे,
ॲड.व्यंकटराव गुंड,तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) चे द्राक्ष बागायतदार तथा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक हनुमंत (दादा)गवळी, सौ.अर्चना माने, डॉ. दिग्गज दापके,शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी बाळासाहेब जमाले,व्यसनमुक्ती कार्यासाठी डॉ.संदीप तांबारे,विठ्ठल चौधरी तसेच आदर्श सरपंच म्हणून अमर सूर्यवंशी या १० मान्यवरांना 'पुण्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला. तसेच कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कारांनी बालाजी वडजे उमरगा, अमोल मुळे,द्वितीय,राजहंस कांबळे व रोशन मुल्ला तृतीय तर विशेष वार्ता गटात माधव आटकोटे प्रथम,रमेश कदम द्वितीय,दिपक बारकुल व डॉ.रविंद्र भताने तृतीय या ८ शोधपत्रकारांना गौरव करण्यात आला.

राजकीय चर्चा आणि सोहळ्याचा उत्साह
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपण एक 'टीम' म्हणून काम करत असल्याचे नमूद केले. जरी काही राजकीय नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली असली, तरी संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी हे सभागृह तुडुंब भरले होते. धनंजय रणदिवे आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नियोजनाचे कौतुक करून त्यांनी हा सोहळा अविस्मरणीय असल्याचे सांगितले.

पत्रकारितेचा गौरव — उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘पुण्यनगरी’सारख्या वृत्तपत्राला सामान्य माणसाच्या भावना, वेदना आणि प्रश्नांना आवाज देणारे व्यासपीठ म्हणून गौरवले. पत्रकार बांधव समाजातील अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहतात आणि सत्य निर्भीडपणे मांडतात, असे सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान 
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दैनिक पुण्यनगरी व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने धनंजय रणदिवे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव संतोष जाधव, सहसचिव राजाभाऊ वैद्य, संतोष हंबिरे, चंद्रशेन देशमुख,संतोष शेटे, प्रविण पवार, संतोष बडवे, दत्ता शिंदे, बालाजी साळुंके, गोविंद पाटील यांच्यासह पुण्यनगरी टीमच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दैनिक पुण्यनगरी अंकाचे शानदार प्रकाशन करण्यात आले.

याचीही रंगली चर्चा....
शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी युवासेना कार्यकर्ते अविनाश खापे, नितीन पाटील, माजी जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, शिवसेना प्रवक्ते ॲड.योगेश केदार यांच्यासह जवळपास 50 शिवसैनिकांना सुरक्षेच्या कारणास्तव नजरकैदेत ठेवण्यात आल्याची चर्चा जोरदार रंगली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी कार्यक्रमात एकत्र येणे टाळले आणि लातूरच्या दौऱ्याचे कारण दिले. ऑपरेशन टायगर प्रकरणानंतर प्रथमच दोघे एकाच मंचावर येण्याची चर्चा होती, परंतु ते टाळले गेले.

या कार्यक्रमाचे बाहरदार सुत्रसंचलन पत्रकार भैरवनाथ कानडे यांनी केले.

"Only न्यूज धाराशिव" - आपल्या जिल्ह्याची आपली बातमी!

Post a Comment

0 Comments