"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
धाराशिव | उमाजी गायकवाड
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्यावेळी रविवारी (१२ एप्रिल) नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक तथा धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी भावनिक भाषण करताना “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी माझे आयुष्य समर्पित करणार” अशी घोषणा केली.
दैनिक पुण्यनगरीच्या वर्धापन दिनानिमित्त आणि धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील पत्रकारांना कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना धनंजय रणदिवे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना म्हटले की, शिंदे साहेबांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. “शिंदे साहेबांसाठी मी माझे संपूर्ण आयुष्य समर्पित करणार आहे,” असे उद्गार काढत रणदिवे यांनी उपस्थितांच्या टाळ्यांचा वर्षाव मिळवला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून कै. अनंत भालेराव यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार बांधवांना शुभेच्छा देताना प्रामाणिक आणि जबाबदार पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. “आजच्या स्पर्धात्मक युगात पत्रकारिता करणे आव्हानात्मक आहे, तरीही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे,” असे शिंदे म्हणाले.
या पुरस्कार वितरणात शोध वार्ता गटात प्रथम क्रमांक मिळालेल्या उमरगा येथील दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी बालाजी वडजे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये अमोल भास्कर मुळे (द्वितीय), राजहंस तुकाराम कांबळे, रोशन मुल्ला, माधव आटकोटे, रमेश अर्जुन कदम, दीपक बारकुल, डॉ.रविंद्र भताने आदींचा समावेश होता.
या सोहळ्याला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव संतोष जाधव, सहसचिव राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबिरे, चंद्रशेन देशमुख,उपाध्यक्ष अब्बास सय्यद, तालुकाध्यक्ष प्रमोद कांबळे, सुरेश घाडगे, गौतम चेडे, श्रीकांत कदम,अशोक दुबे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने पत्रकार बंधू-भगिनी उपस्थित होते.
धनंजय रणदिवे यांच्या या घोषणेनंतर कार्यक्रमात उत्साही वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही धनंजय रणदिवे यांचे मनापासून अभिनंदन केले.
“आपल्या परिसरातील ताज्या बातम्या मिळवण्यासाठी Only न्युज धाराशिव ला लाईक, शेअर आणि फॉलो करा.”
0 Comments