"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
जिद्द, चिकाटी आणि कष्टातून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार हनुमंत भानुदास गवळी यांचा युरोप काबीज करणारा प्रवास धाराशिव जिल्ह्यासाठी अभिमानाचा ठरला आहे.
'दैनिक पुण्यनगरी' आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा 'पुण्य पुरस्कार' प्रदान करण्यात आल्यानंतर, गवळी यांचे सावरगाव येथे मान्यवरांकडून शाही स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे त्यांच्या कष्टाचे आणि प्रयोगशील शेतीचे खऱ्या अर्थाने सोने झाले आहे.
शून्यातून विश्व: ५ एकरातून ८५ एकरांचे साम्राज्य
हणुमंत गवळी यांची यशोगाथा कोणत्याही तरुणासाठी प्रेरणादायी आहे. वडिलोपार्जित अवघ्या ५ एकर शेतजमिनीपासून त्यांनी २००१ मध्ये द्राक्ष शेतीला सुरुवात केली. स्वतःच्या घामावर विश्वास ठेवून त्यांनी आज ८५ एकर जमीन खरेदी केली असून, त्यापैकी ७० एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाची द्राक्ष बाग फुलवली आहे. या यशामध्ये त्यांचे बंधू श्रीमंत भानुदास गवळी यांचा सिंहाचा वाटा असून, ही दोन भावांच्या एकत्रित कुटुंबाची आणि मेहनतीची गाथा आहे.
युरोपच्या बाजारपेठेत धाराशिवचा डंका
गवळी यांनी केवळ शेतीच केली नाही, तर ती जागतिक स्तरावर नेली. दरवर्षी त्यांच्या ७० एकरावरील निर्यातक्षम द्राक्ष थेट युरोप खंडात निर्यात होतात. ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याने जागतिक बाजारपेठ काबीज करणे, ही जिल्ह्यासाठी भूषणावह बाब ठरली असून, याच प्रयोगशीलतेची दखल दैनिक 'पुण्य नगरी' आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाने घेतली. रविवारी धाराशिव येथे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
मुलांच्या शिक्षणातून घडवली दुसरी पिढी
शेती सांभाळतानाच गवळी यांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाकडेही विशेष लक्ष दिले. त्यांचा मुलगा अर्जुन (बीएससी ॲग्री), कन्या वैभवी ( बीई कॉम्प्युटर), मुलगा समर्थ आणि पुतणी श्वेता (एमबीबीएस) हे सर्वजण उच्च शिक्षण घेत असून, शेतीसोबतच शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे.
सावरगावात मान्यवरांच्या हस्ते शाही सत्कार
पुरस्कार मिळाल्यानंतर गवळी यांचे सावरगाव येथे आगमन होताच पंचायत समिती सदस्य संतोष बोबडे यांच्या निवासस्थानी एका विशेष कार्यक्रमात त्यांचा शाही सत्कार करण्यात आला. पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती विक्रमसिंह देशमुख, पंचायत समिती सदस्य संतोष दादा बोबडे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भाले यांच्या हस्ते हणुमंत गवळी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रेवनसिध्द आंधळकर,नरसिंग धावने,धनु धावणे, विश्वास कदम,राजेंद्र डोलारे, केमवाडीचे फंड आदी मान्यवर उपस्थित होते.
हणुमंत गवळी सध्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक म्हणूनही कार्यरत असून, त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
"Only न्यूज धाराशिव" - आपल्या जिल्ह्याची आपली बातमी!
0 Comments